गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन
भारतीय बाजारपेठेत “वांग्या”च्या गुणसूत्रांत अनैसर्गिक बदल केलेली वांगी विक्री करण्याचा परवाना द्यावा अथवा नाही याबद्दल यानिमित्ताने बराच विचारविनिमय,चर्चा आणि उहापोह झाला आणि अशा परवान्यास केंद्रिय शासनाने तात्पुरती स्थगिती दिल्याने आता ही चर्चा बराच काळ चालेल.
अशा तर्हेचा परवाना द्यावा किंवा देवू नये याविषयी नेहमीप्रमाणेच मुख्यत्वे ३ गट पडलेत.
१) टोकाचे समर्थन करणारे
२) टोकाचा विरोध करणारे.
३) जो काही निर्णय घ्यायचा पुरेपुर विचारांतीच घ्यावा,निष्कारण घाई करू नये या मताचे.
ही चर्चा पुढे चालविण्यापुर्वी मी असा परवाना देण्याचा समर्थक आहे हे मान्य करू इच्छीतो.
बी टी वांग्याचा मी समर्थक आहे,त्यामागील पार्श्वभूमी.
१) मनुष्यप्राण्याचा विकास केवळ नवनवे संशोधन व नवनवी साधन निर्मीती यातूनच होत असते.
२) काळाच्या ओघात निसर्गतः होणारी उत्क्रांती,बदल कोणीच रोखू शकत नाही.ते रोखताही येत नाही,किंबहूना अशा बदलानेच मानसाचे जीवन अधिक समृद्ध आणि सुखकारक झाले आहे.
३) तसेच मानवनिर्मित संशोधने फार काळ रोखून धरता येणार नाही.अशा संशोधनांना आममार्गाने प्रवेश नाकारला तर ते वाम मार्गाने येतील.
४) या संशोधित जातीचा वापर करणे ऐच्छिक आहे.
परंतू अशा तर्हेचा परवाना देण्याअगोदर आणि अशी संशोधने अंमलात आणतांना ती मनुष्यप्राण्यासाठी “जिवघेणी” ठरणार नाही, याची काळजी घेणे फारच महत्वाचे आहे,असे मला वाटते.
त्या साठी काही मुलभुत बाबी विचारात घेणे आवश्यक आहे.
गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन-हे शास्त्रीय किचकट शब्द बाजुला ठेवून अगदी सर्वांना सहज समजेल अशी काही उदाहरणे तपासू.
१) बासमती भातात एचएमटी भाताची भेसळ.किंवा म्हशीच्या दुधात गायीच्या दुधाची भेसळ.
२) बासमती भातात खडे,बारीक दगडांची भेसळ.किंवा म्हशीच्या दुधात पाण्याची भेसळ.
३) बासमती भातात रासायनिक खतांची भेसळ.किंवा म्हशीच्या दुधात चुना किंवा रसायनिक द्रवाची भेसळ.
या झाल्या भेसळीच्या तीन पद्धती.
पहिल्या प्रकारची भेसळ वाईट पण माफीयोग्य.
दुसर्या प्रकारची भेसळ जास्त वाईट आणि ग्राहकाला पिडादायक.
पण तिसर्या प्रकारची भेसळ ही चक्क जिवघेणीच.
गुणसूत्रांची अदलाबदल आणि जेनेटिकली मॉडिफिकेशन- या बाबतीतही तेच म्हणता येईल.
१) समवर्गीय वनस्पतीच्या जनुकांची अदलाबदल-फायदेशीर ठरली.(शुन्य नुकसान)
२) वनस्पतीवर रसायन प्रयोग/उपयोग – फायदेशीर पण मानवी जीवितास थोडे अपायकारक
३) मातीमधले जनुक काढून कृत्रीमरित्या वनस्पतीमध्ये जनुकीय बदल घडवून आणणे – फायदा दिसतो पण
मानवी जीवनावर नेमके काय बरेवाईट परिणाम होतील ?
याचे नक्की उत्तर कोणाकडेच नाही.
तेंव्हा या विषयावर पुरेपूर विचार होवूनच निर्णय घेतले पाहीजेत.
तुम्ही-आम्ही किती काळ जगणार..? माहीत नाही.
परंतू भूतलावर मनुष्यजातीला यापुढील हजारो वर्षे जगायचे आहे….. हेही लक्षात घेतले पाहीजे.
.
गंगाधर मुटे
………………………………………………………….
तळटीप.
विष निर्माण केले की त्याची पडताळणी उंदरावर केली जाते.
उंदराचा किती वेळात प्राण जातो त्यावरून त्या विषातिल विषाचे प्रमाण ठरविले जाते.
आता बीटी जनुकाचे मानवी जिवनावर काय परिणाम होतात ते तपासायचे झाले तर जगात भारताव्यतिरिक्त दुसरा कोणता देश तयार होईल हो “उंदिर” बनायला..?
………………………………………………………….
एप्रिल
12
2010