शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.

१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा – शेतकरी आत्महत्यावर तज्ज्ञांची मुक्ताफळे – )

२) आर्ट ऑफ लिविंग किंवा मानसोपचार शिबिरे आयोजित करायला हरकत नाही पण शेतकर्‍यांचे मनोबळ वाढावे यासाठी काय सांगणार? प्रबोधनाचे स्वरूप काय असणार?
उदा. शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर त्याचे मनोबळ वाढविण्यासाठी

अ) कर्ज परत करण्यासाठी चोरी करा, दरोडे घाला आणि पैसे मिळवून कर्ज परत करा असे सांगणार? (शेतीच्या उत्पन्नातून/बचतीतून त्याला कर्ज फ़ेड करता आली नाही हे गृहीत धरावेच लागेल.)

आ) मरण पत्करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिकण्याचा सल्ला देणार?

इ) आर्थीक हलाखीमुळे मुलीचे लग्न करता येत नसेल तर टेंशन घेऊ नकोस, ती बिनालग्नाची राहीली तरी चालेल पण तू जगलाच पाहीजे असे सांगणार?

ई) सावकाराने कर्जापायी भरचौकात अपमान केला तरी तू मनाला लावून घेऊ नकोस, संवेदनाक्षम, हळवेपणाने जगण्यापेक्षा कोडगेपणाने वाग असा सल्ला देणार?

            मानसोपचार शिबिरे घेणार म्हणजे त्याला काय समजावणार याचा उलगडा व्हायला हवा.
रोगाचे निदानच चुकीचे घेवून एखादा मानसोपचारतज्ज्ञ उपचार करणार असेल तर अपेक्षित परीणाम कसा साधला जाईल?
हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.
………………………………………………………
या अनुषंगाने झालेली एक प्रश्न-उत्तरांची देवानघेवान.


शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर पुष्कळ चर्वितचर्वण  झाले आहे.
(आणि त्या सर्वांच्या मते शेतकरी मुर्ख, मनोरुग्न व अज्ञानी आहे.)


 कित्येकदा तर मूळ विषयाचे गांभीर्य दडपून टाकून, केवळ सरकारवर तोफा डागण्यासाठी हा विषय ‘हायजॅक’ केला गेला आहे.
(हे ‘हायजॅक’ करणारे मात्र नक्कीच मनोरुग्न असणार. पाठवा त्यांना मेंटल हॉस्पीटल मध्ये. माझे सक्रिय समर्थन.)


मुंबईतल्या किंवा कुठल्याही झोपडपट्टीमधले, उकिरड्यातले अन्न वेचून खाणारे, रेल्वे रुळांवर शौचास जावे लागत असलेले, दिवसोंदिवस आंघोळ करू न शकणारे लोक आत्महत्या का करीत नाहीत? 
(ते सात पिढ्यांत फेडता येणार नाही एवढे कर्जबाजारी नाहीत म्हणून.)


त्यांच्यामध्ये जगण्याची कोणती प्रेरणा असते?
(सर्व सजीवांमध्ये जगण्याची  प्रेरणा सारखीच असते.)


 किंवा, उलटपक्षी, कॅट सारख्या परीक्षांतील अथवा कुठल्याही परीक्षेतील अपयशाला घाबरणारे, आय. आय. टी सारख्या नामवंत शिक्षणसंस्थांतून शिकणारे लोक आत्महत्या का करतात? त्यांच्यामध्ये कोणती प्रेरणा कमी पडते? महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालांच्या आगेमागे आत्महत्यांची लाट का येते?  रोज रात्री नवर्‍याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाऊन, प्रसंगी डाग, चटके सोसून पुन्हा सकाळी निमूटपणे सर्व अपमान व सर्वांसमोर झालेली शोभा विसरून(सूडाची भावना न ठेवता) त्याच्यासाठी स्वयंपाक बनवणारी स्त्री कोणत्या अंतःप्रेरणेने जगत असते? त्यातल्या काही आत्महत्या करतातही, पण एकंदर अत्याचाराच्या प्रमाणात त्या नगण्य असतात.
(आत्महत्येस एवढेच कारण पुरेसे नाही.)


शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशातल्या एकूण आत्महत्यांमधला एक छोटा भाग आहे.
(किती शेतकर्‍यांनी पुन्हा आत्महत्या कराव्यात म्हणजे आंकडा शोभून दिसेल ????????.
सबंध देशात फक्त एका शेतकर्‍याने जरी आत्महत्या केली तरी एखाद्याला ते लाजीरवाने वाटेल. याउलट आत्महत्या करता करता एखादी पिढी जरी उध्वस्त झाली तरी एखाद्याला त्याचे काहीच वाटणार नाही. हे समिकरण शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संख्येवर नव्हे तर त्या “एखाद्याची” मानसिक रचना/ठेवन कशी आहे यावर अवलंबून आहे. )


 त्यातूनही, सर्वच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात का?  
(“सर्वच कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आता सामुहीक आत्महत्या करून  तसे सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास आत्महत्या करणार्‍याला आम्ही मनोरूग्न म्हणत राहू, इतर कुठल्याही कसोट्यांवर पडताळा करण्याची गरज नाही” असा याचा अर्थ घ्यायचा काय? )


जर ह्याचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर आत्महत्यांमागे मनोदुर्बलता हे कारण असण्याची शक्यता वाढते.


(मग सरकार झोपी गेले काय? अशा मनोरूग्न शेतकर्‍यांची तातडीने राज्यवार यादी बनवा आणि प्रसिद्दीला द्या. म्हणजे अशा मनोरूग्न शेतकर्‍यापासून इतर शेतकरी बांधव सुरक्षीत अंतर ठेवून चालतील.)


गंगाधर मुटे
………………………………………………………………..

11 comments on “शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

 1. शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होतात ते आपला शेतीसुधारणेचा प्रयोग अपयशी ठरला म्हणून. प्रयोगाबद्दल अवास्तव अपेक्षा बाळगल्याने प्रयोगाचे माफक यश त्याना अपयशासारखे वाटते.

 2. Shri Manohar yaanche he vareel mat neet samajale nahi..

  Shetkari ya karanane atmhatya karto?

  By the way article sundar ahe. Kharech ahe..diagnosis chukiche asel tar kaay upchaar karnaar..

  Pan Sir, mala vatate ki sahaj na harta ahe tyatoon vaat kadhayala eka level paryant psychotherapy upyogi padoo shakel..

  • गद्रेजी, शेतीमध्ये प्रयोगाचे फ़सणे याचा अर्थ कर्जबाजारीपणा वाढणे असा होतो. शेतीत प्रयोग फ़सणे आणि आत्महत्त्या यांचा थेट संबंध नसूनही घनिष्ठ संबंध आहेच.

 3. नमस्कार!

  मी मुंबई शहरात जन्माला आलेला, वाढलेला आहे. माझं वय 38 वर्षे आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या अनुभवांनुसार मला असे वाटते की, कर्ज घेण्यापूर्वी व घेताना काही विधी करायला हवेत. इथं विधी म्हणजे ‘ कर्ज मागताना कर्ज मागणारा आपले पूण्यच गमावणार नाही ही अशी खबरदारी घेणारी क्रिया.’ प्रत्येक भौगोलिक प्रांताला स्वत:चं असं अध्यात्मिक वलय असतं. जसे प्रत्येक गावात जशी स्थानदेवता असते. अगदी तसंच काहीसं. ह्या अध्यात्मिक वलयाचा आपल्या कल्याणासाठी वापर करून घेण्यासाठी देवघेव करताना पूर्वापार पासून ज्या प्रथा चालल्या आहेत/ होत्या त्या व्यवस्थित समजून घेत जमल्यास योग्य ते बदल करीत त्यांचा वापर केला जायला हवा. ‘देवघेव’ करताना वा तशी बोलणी करताना त्यासोबतच काही पद्धतशीर कृती केल्या तर ‘पूण्य गमावण्याचा’ धोका टाळता येवू शकतो. कष्टाला पूण्याईची जोड असायला हवी, तरच यश मिळतं. हे आपण सर्वच जाणतो. पण बोलणी करताना पूण्य राखून कसे ठेवायचे? ह्या कडे दुर्लक्ष झालं की ‘कर्ज घेवून शेती करण्याचा प्रयोग फसत असावा.
  माझे हे उत्तर तुम्हाला वेगळं वाटेल पण आयुष्यात जे अनुभव आले त्यावर हे आधारलेले आहे. म्हणून मांडले.

  – सतीश रावले

 4. सतिशजी अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
  कष्टाला पूण्याईची जोड असायला हवी, तरच यश मिळतं. हे मत योग्य.
  पण स्वत: उपाशी राहून इतरांना जगवणार्‍या “पोशिंदयाची” पुण्याई कुठे कमी पडत असावी?
  की ज्यामुळे त्याला हलाखीचे जीवण जगावे लागते. आणखी यापेक्षा तो आणखी काय करू शकेल ज्यामुळे त्याचे पुण्यबळ वाढण्यास मदत होईल? असो.
  प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

 5. गंगाधर राव,
  नमस्कार!

  ‘विदर्भातील शेतकर्‍याची पुण्याई कमी पडते’ असे माझे म्हणणे नाही, नव्हते. ‘बोलणं, लिहीणं ही एक कला आहे’ एवढंच आपण सगळे जाणतो. पण त्याही पुढे काही गोष्टी आहेत. शब्दातून, शाररीक हावभावातून एक उर्जा वाहते. त्या उर्जेचा सुयोग्य वापर करण्यासाठी व त्या उर्जेची नकारात्मकता टाळण्यासाठी काही खबरदारी देखील घेतली जायला हवी.
  पारंपारीक धार्मिक विधी, स्थानदेवता ग्रामदेवते पुढे नवस, वंदन ह्या त्यापैकी काही पद्धती म्हणता येतील.

  आज आपण पाहतो कि प्रसिद्धीचा झोत, व त्यायोगे पैशाचा ओघ ज्या मंडळीवर आहे ती मंडळी ह्या उर्जेचा व्यवस्थित वापर कळत-नकळत करीत असतात. उदा.-नेते मंडळी, कलाकार, खेळाडू. तेच तंत्र सामान्यातील सामान्य जनतेकडे यायला हवे. असे मला अभिप्रेत आहे.

  आपण जर पाहीले तर आज आधुनिक काळातील. कोणतेही काम करायचे असेल तर कागदपत्रे, लिखापढी केल्याशिवाय होत नाहीत. लिखीत शब्दाला फार महत्व आलेले आहे. घर विकत असो कि भाड्याने घ्यायचे असेल, गाडी विकत घ्यायची असेल तर एक विशिष्ट विधीद्वारे- एका लिखाणावर आधारीत प्रोसिजर द्वारेच ती पूर्ण होते. पण ही एक बाजू आहे दुसरी बाजू आहे मी जी वर मांडलेली -म्हणजे -बोलताना अनावश्यक शब्दांचा वापर टाळणारी, चूकिचे शाररीक हावभाव, उभे राहण्याची पद्धत इत्यादी गोष्टींकडे लक्ष देणारी. कर्ज हवे म्हणून अगदी अगतिक होवून बोलण्याची, वागण्याची गरज नाही. असा विचार सामान्यातील सामान्याकडे पोहचला जायला हवा. प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असतेच. आपली गरज आधी व्यवस्थित शब्दबद्ध करून ती कागदावर उतरवली जायला हवी.

  पूण्यबळ कसे वाढवायचे? हा प्रश्न नाही. ते टिकवायचे कसे? ह्याबद्दल मी विचार मांडला होता/ आहे.
  एवढे असून ही मी या विशयात अध्यात्मिक दृष्ट्या अजून तेवढी प्रगती केलेली नाही. फक्त शेतकरी मग तो कोणत्याही विभागतला का असेना, तो आत्महत्या करतो, हे मला देखील योग्य वाटत नाही.

 6. सध्‍या शेतकरी शेतात राब राब करीतो तरी सुघ्‍दा या सरकरला त्‍याची किव येत नाही आणी शेत मालाला पुरेसा असा भाव देत नाही या सरकरला काय बोलावे आणी काय बोलु

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s