……………………………….
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट
शरद जोशी
या मंचावर उपस्थित असलेले आंध्रप्रदेश,हरयाना,कर्नाटक या राज्यांचे शेतकरी प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून आलेल्या महिला शेतकरी भावांनो आणि मायबहिनींनो, मी तुम्हाला पहिल्यांदा प्रणाम अशासाठी करतो की गेली सहा वर्षे मी राज्यसभेचा खासदार असल्यामुळे शेतकरी संघटनेचं हे सगळं वैभव पाहण्याची संधी मला मिळाली नव्हती. फ़ार फ़ार वर्षांनी पुन्हा एकदा सबंध मैदान गच्च भरलेली शेतकर्यांची सभा पुन्हा माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि माझे डोळे तृप्त झाले. गेल्या ८-१० दिवसातली बातमी आहे, वर्ध्यासारख्या ठिकाणी गांधीचं नाव घेऊन सोनिया गांधी स्वत: येत असताना कोट्यावधी रुपये जमा झाल्याखेरीज १०-२० हजाराची सभा कॉंग्रेसला जमा करता येत नाही. आणि येथे केवळ वर्तमानपत्रामध्ये निरोप देऊन लाखाच्या वरची सभा येथं जमते, तुम्हाला सगळ्यांना मी शतश: प्रणाम करतो.
मघापासून मी बघतो आहे, कधी इकडचा एखादा मनुष्य,कधी तिकडचा, कधी दोनचार इकडचे तिकडचे उठून मागे वळून पाहताहेत. जशी एखादी अत्यंत रुपवती सुंदर मुलीला आपण खरंच किती सुंदर आहो, त्याचा अंदाज घेण्याकरिता आरशाच्या समोर उभे राहून मागे वळून वळून पाहावंसं वाटतं, तसंच शेतकरी उभे राहून वळून मागे पाहात आहेत की, आपली गर्दी केवढी आहे. तुमचे सगळ्यांचे मी शतश: आभार मानतो. आणि त्याच्या बरोबर मी तुमची क्षमा मागतो. क्षमा अशाकरिता मागतो की, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत हिंदुस्थानातला सगळा शेतकरी संपूर्णत: कर्जमुक्त होत नाही – त्यात छोटा नाही,मोठा नाही,उसाचा नाही,कापसाचा नाही,सगळा शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही- तोपर्यंत कोणत्याही तर्हेचा सत्कार, कोणत्याही तर्हेचा हार, कोणत्याही तर्हेचा सन्मान मी स्विकारणार नाही, अशी मी तुमच्यासमोर शपथ घेतली होती. तुम्ही गेले दोन तास येथे बघताहात, इथे काय काय कार्यक्रम झाला आणि तुम्ही मनामध्ये प्रश्न विचारला असाल की शरद जोशींनी सत्कार घेणार नाही अशी शपथ घेतली होती, आणि इथे तर सत्कारच सत्कार चालू आहे. खरं आहे काय?
प्रतापसिंह यांनी शपथ घेतली होती की, जोपर्य़ंत चित्तोडचा किल्ला माझ्या हाती पुन्हा येत नाही तोपर्य़त मी गादीवर झोपणार नाही. प्रतापसिंह निघून गेले आणि मग त्यांच्या वंशज़ांनी नावापुरत्या गादीच्या खाली २-४ गवताच्या काड्या टाकून झोपायला सुरुवात केली, तसं काही शेतकरी संघटनेच्या बाबतीत होते की काय, अशी तुमच्या मनात शंका आली असेल. म्हणून भाषणाच्यापुर्वी मी तुम्हाला स्पष्ट करतो की, शेतीमालाला भाव मिळवून देणे आणि शेतीमालाला भाव मिळू नये याच्याकरिता जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जी जी काही अडथळे, जी जी काही बंधने घातली जातात, ती,त्या बंधनांचा प्राणपणाने विरोध करण्याची शपथ, मी संघटनेत घेतलेली प्रतिज्ञा आजही जशीच्या तशी शाबूत आहे. आणि तितक्याच वेगाने आता मी अमंलात आणणार आहे.
विचित्र गोष्ट अशी आहे की, इथे बोलतांना अनेकांनी सांगीतलं की महाराष्ट्राच्या शेतकर्यांसमोर फ़ार गंभीर प्रश्न उभे आहेत. तुमची वीज तोडून टाकणार असं उर्मटपणे मंत्री बोलतात आणि त्याच्याबरोबर दुसरा एक मंत्री दिल्लीहून सांगतो की आता तुमच्या डिझेलचा भाव दुप्पट तिप्पट होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतमजुरीचा दर जेव्हा शेतकरी संघटना चालू झाली होती तेंव्हा ३ रुपये होता. आज १५० रुपये रोजाच्या खाली कुठेही मजूर मिळत नाही. सगळ्या शेतमजुराची ही जी काही उन्नती झाली आहे,त्याचं श्रेय्य एकट्या शेतकरी संघटनेकडे आहे, हे मी तुम्हाला सांगतो.पण वीज नाही, औषध खत नाही, खत घ्यायला गेलं तरी ते सुद्धा विकत मिळत नाही. मजुरीचा दर १५० रुपयाच्यावर, शेती कशी करायची? हा मोठा गंभीर प्रश्न सगळ्या शेतकर्यांसमोर आहे. निर्यातीच्या बंधनामुळे कापसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, उसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, आणि हे सगळं असतांना सभेच्या दोन–अडीच तासापैकी दिड तास केवळ सत्कारावरती वापरला गेला, याच्या बद्दल मी तुमची सगळ्यांच्या वतीने क्षमा मागतो. माझ्या सहकार्यांनी सत्काराचा एवढा घाट घातला, त्याची भावनाही थोडी मी समजून घेतो,थोडी तुम्ही समजून घ्या. यांनी माझ्याबरोबर गेली २५ वर्ष काम केलं आहे, माझ्याबरोबर ते तुरुंगात गेले आहे, घरादाराचा कधीही विचार केला नाही, शरद जोशींनी हाक दिली की घर सोडून ते पिसाटासारखे बाहेर आले आहेत. त्यांच्या माझ्याविषयी काही व्यक्तिगत भावना आहेत, आणि मी त्यांना कितीही सांगीतलं, कोणत्याही प्रकारचा सत्कार करू नये, तरी त्यांची अशी बुद्धी होते की, आपल्या भावनेला कुठेतरी वाचा फ़ुटली पाहीजे, म्हणून त्यांच्या हस्ते ही आगळीक घडली, त्यांना आपण क्षमा करावी, मी त्यांना क्षमा केली आहे.
हिंदुस्थानतल्या सगळ्या शेतकर्यांसमोर वेगळे-वेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांचे जे प्रश्न सांगीतले त्या प्रश्नामध्ये वीज तोडण्याचा प्रश्न, धानाचा भावाचा प्रश्न, कपाशीच्या भावाचा प्रश्न व उसाच्या भावाचे प्रश्न सांगीतले. आम्ही आताच किसान समन्वय समितीची भली मोठी एक दिवसभराची बैठक घेतली, तिच्या मध्ये आणखी काही वेगळे प्रश्न आले आणि अद्यापपर्यंत या सगळ्या सभेमध्ये कोणीही न मांडलेला मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो. कदाचित तुम्ही त्याच्याबद्दल वाचलं नसेल. जे शेतकरी संघटक वाचतात त्यांना त्याचा थोडाफ़ार अंदाज असेल. पण काही वर्षापुर्वी, ४० ते ५० वर्षापुर्वी भारत सरकारने आणि राज्य सरकारने, सगळ्या शेतकर्यांच्या जमिनीवरती सिलींग लादण्याचा कायदा केला होता, ते तुम्हाला आठवत असेल, १८ एकर आणि ५४ एकर. आता केंद्र सरकार एक नवीन कायदा करित आहे आणि त्या कायद्यामध्ये आता १८ एकर नाही, ५४ एकर नाही, जास्तीत जास्त जमीनधारणा ही बागायती क्षेत्राकरीता २ एकराची आणि कोरडवाहू क्षेत्राकरीता फ़क्त ५ एकराची असणार आहे. हे दोन आकडे तुम्ही लिहून घ्या. मनाशी विचार करा की, ज्या लोकांनी तुम्हाला खर्या शेतकर्याचे नेते आपणच आहोत, म्हणून गावोगाव पोस्टर लावली, तेच लोक आता शेतकर्याला २ एकरापेक्षा जास्त एकर जमीनधारणा करता येऊ नये, अशा तर्हेचा कायदा आणणार आहे.
पंडीत जवाहर नेहरू जिवंत असताना एकदा त्यांनी असा प्रयत्न केला होता. आणि ज्या पक्षाचा वारसदार स्वतंत्र भारत पक्ष आहे, त्या स्वतंत्र पक्षाने आणि चक्रवर्ती राजगोपालाचारींनी नागपूर कॉंग्रेसमध्ये त्यांचा बेत हाणून पाडला होता. तुमच्या शेतीवरती जी संकटे येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं,सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल तर पुन्हा एकदा दुसर्यांदा येणारा हा जमीन धारणाकायदा असणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला आज जी काही लढाई करायची असेल ती करा, धानाकरीता करा, उसाकरीता करा, कापसाकरीता करा, पण उद्या तुमची जमीनच राहिली नाहीतर तुम्ही शेतकरीच कसे राहणार? तेव्हा मुख्य जी तुमची ताकत लावायची आहे ती शेतकर्याच्या जमीनीचं राष्ट्रीयीकरण होऊ नये, शेतकर्याला जमीन ठेवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याची वासलात लावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याच्याकरीता आपल्याला लढाई द्यावी लागणार आहे आणि मी देखील आता इथे झालेली पुष्कळशी भाषणं ऐकली, तरूण मंडळींनी मोठ्या जोषात भाषणं केलीत, मी तुम्हाला सांगणार आहे की, शेतकरी संघटनेने कधीही त्वेषपूर्ण व जोषपूर्ण भाषणांवर विश्वास ठेवला नाही.
शेतीच्या परिस्थितीचा शांतपणे विचार करावा, हिशेब मांडावेत, आपलं काय चुकत आहे याचा हिशेब मांडावा, पिक काढण्याकरिता आपल्याला काय खर्च येतो आणि आपल्याला मिळतं काय? याचाही हिशेब मांडावा, आणि असा शांत डोक्याने हिशेब मांडून मग काय आंदोलन करावं त्याचं अर्थशास्त्र मांडावं, हा शेतकरी संघटनेनी गेली २५-३० वर्ष तुम्हाला दिलेला संदेश आहे. गेली २५-३० वर्ष सतत शेतकरी संघटनेनी केलेली भाकितं खरी ठरली. ते आता उस कारखाण्याविषयी बोलत आहे. पण उस कारखाने सगळी बुडणार आहेत, हे भाकित शेतकरी संघटनेने २५ वर्षापुर्वी केलं. कापूस एकाधिकार हा शेतकर्यांच्या शोषणाचं षडयंत्र आहे, हे कापूस एकाधिकार बंद झाला पाहिजे ही मागणी शेतकरी संघटनेने केली होती. मी काही जोतिषी नाही, मी काही भविष्यवेत्ता नाही आणि तरीही माझ्या तोंडून निघालेली ही भाकितं २५-२५ वर्षांनी का होईना,पण १०० टक्के खरी ठरतात. याचं कारण असं की आम्ही मनामध्ये कोणत्याही तर्हेचा राग द्वेष येऊ न देता, प्राप्त परिस्थितीचा शांतपणे विचार केला आणि शांतपणे विचार करून मार्ग काढला. आणि म्हणून जे राजस्थानातल्या प्रतापसिंहाना जमले नाही, जे हरयानातल्या जाटांना सुद्धा जमले नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे महाराष्ट्रात करून दाखविले. कारण गनिमी काव्याची लढाई आणि शांत डोक्याची लढाई महत्वाची असते.
मी तुम्हाला पहिल्यांदा एक सल्ला देणार आहे की सगळी भाषणे झाली, कृतीमध्ये आपण कोठे कमी पडणार नाही, पण कृती करताना आणि जहाल कृती करताना सुद्धा डोक्याची शांती कधीही घालवू नका, आपल्याला आंदोलन करताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती ही की, सरकार म्हणतं की सगळ्यांना खायला मिळालं पाहिजे, अन्नधान्य अधिक पिकवा, पण त्याच्यामध्ये एक मंत्री बेमुर्वतखोरपणे म्हणतो की, आम्ही तुमची वीज कापणार आहो, आणि वीज कापण्याकरीता तुमच्या गावात सुद्धा कोणी मनुष्य येणार नाही. का? आमच्या वीज कंपनीचा कोणी मनुष्य गावातली वीज कापायला आला तर तुमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्याच्या विजेच्या खांबावरती तो चढला म्हणजे त्याच्या खालती त्या आग लावून देतात. म्हणून तुमच्या गावात आम्ही कोणाला पाठवणार नाही. आम्ही काय करणार? तालूक्याच्या गावी किंवा त्याच्या पलिकडे जिथे आमचा ट्रांन्सफ़ार्मर आहे, ते आम्ही ट्रांन्सफ़ार्मर काढून नेणार, तुमच्या गावात यायला नको, तुमची वीज आम्ही तोडतो. याला वाटतं आपण खूपचं शहाणपण आणि युक्ती वापरली. आपण गनिमीकावा केला पण या गनिमीकाव्यापेक्षा सरस गनिमीकावा शेतकरी संघटनेकडे आहे. तू वीज कोणती कापणार? जी वीज तुझ्या साठ्यात राहील तीच ना? पण त्या साठ्यातली वीज येते कुठून? ती वीज येते आमच्या विदर्भातून. मघाशी जी जी भाषणं झाली वामनरावांनी भाषण केलं, रवि देवांगनी भाषण केलं. मी त्यांना सांगतो, तुम्हाला माझं वय ७५ झालं काय, १०० झालं काय, याचं काहीच देणंघेणं नाही. परंतू जर का तुमची वीज कापण्याकरीता तालुक्याच्या पातळीवरून ट्रांन्सफ़ार्मर हलवणारा तो शेतकर्याचा मुलगा आहे की नाही, मला शंका आहे. जर का कोणी असं करायला लागला तर ज्या मिळेल त्या मार्गाने विदर्भातली वीज महाराष्ट्रात जाणार नाही, याची जमेल त्या मार्गाने काळजी घ्या. कोणताही मार्ग वापरा. पण एवढ्याने लढाई संपणार नाही. तुम्ही धान्य वाढवावं, पिक वाढवावं, असं सरकारला वाटतं. पण तुम्हाला वीज मात्र मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, खतं मिळणार नाही, औषध मिळणार नाही, अशा तर्हेने सगळ्या शेतकर्यांना कोंडीत घालण्याचा प्रयत्न चाललाय. वीज नाही, औषध नाही, खतं नाही, बियाणही मिळणं कठीण आहे. एवढंच नव्हे तर तुमची जमीन सुद्धा फ़क्त २ एकर तुमच्याकडे राहील. मघाशी एक मुद्दा मी सांगायचा विसरलो, तो पुन्हा सांगतो, त्या कायद्यामध्ये तरतुद आहे की आता आम्ही हे जे नवीन नियम ठरवले. २ एकराचा आणि ५ एकराचा. ४० वर्षापुर्वी १८ एकर आणि ५४ एकर ठरलं. पण या कायद्याचा अमंल आता आम्ही ४० वर्षापुर्वीपासून घेणार आहोत. म्हणजे ४० वर्षापुर्वी तुमची जमीन किती होती? त्यावेळी जर का तुमच्याकडे जमीन जर समजा १०० एकर असेल, त्याच्यातली तुमच्याकडे १८ एकर राहीली. ८२ एकर त्यांनी काढून घेतली. आता तुमच्याकडे जी जमीन उरली त्याचा हिशेब लक्षात घेता, तुमच्याकडे फ़क्त २ एकर ठेवून ९८ एकर जमीन तुमच्याकडून काढून घ्यायची आहे. आणि याचा अर्थ असा की तुमच्याकडे आता जर जमीन राहीली नसेल, ही जी १८ एकर होती त्यापैकी सुद्धा काही जमीन तुम्ही काही विकून टाकली असेल तर काय करायचं? जुन्या काळी लेव्हीची व्यवस्था होती आणि तुमच्याकडनं ज्वारीची पोती घेऊन जायला सरकारी अधिकारी यायचे आणि तुमच्या घरी जर का लेव्ही घालायला ज्वारी नसली तर तुम्ही बाजारातून ज्वारी महागात विकत आणायची आणि ती स्वस्त भावात लेव्ही घालायची. हा मुर्खपणा तुम्ही केलाय ना? सरकारचं म्हणणं आहे की आता तुम्ही तेच करा. तुमच्याकडनं आम्ही जमीन काढून घेणार आहोत तेंव्हा त्याच्याकरिता पाहिजे तर बाजारातून नवीन जमीन विकत घ्या आणि आम्हाला द्या. ही केवढी भयानक गोष्ट आहे? याचा फ़क्त तुम्ही विचार करा. या परिस्थितीमध्ये आपल्याला डोकं शांत ठेवून शेती करायची आहे आणि मी तुम्हाला अशी विनंती करतो की, ह्या करीता काही शिस्त शिकावी लागेल. ही कल्पना मी काही पहिल्यांदा मांडतो आहे असे नाही. परभणीच्या अधिवेशनात मी मांडली होती. आम्ही वाटेल तितकं पिकवू. आणि त्या सगळ्या पिकाला आम्ही मागू तो भाव मिळाला पाहिजे, हे जगामध्ये शक्य नाही. कोणत्याही बाजारपेठे मध्ये हे शक्य नाही. ज्याला आपल्या पिकाचा भाव मिळवायचा आहे त्याला पिकाचं नियंत्रण करायला पाहिजे. तुमच्या घरची पोरं जशी हुशार व्हावी तर कुटूंबनियोजन केलं पाहिजे. तसं पीक नियोजन केल्याशिवाय तुम्हाला आता गत्यंतर नाही. कुटूंबनियोजनासारखं “हम दो, हमारे दो” सारखं आता आपल्याला पीक नियोजन करावं लागेल. आणि सोपी गोष्ट. मी जेंव्हा शेतकरी संघटनेचं काम चालू केलं तेंव्हा मला आठवतं की आमच्या एक कार्यकर्त्या शैलाताई देशपांडे, माहेरघर शहरातलं, लग्न झालं शेतकर्याच्या घरी. आणि त्या म्हणाल्या की पहिल्यांदा मला असं आश्चर्य वाटलं की, शेतकर्याच्या घरी खूप धान्य असतं पण शेतकर्याच्या घरी मात्र खातांना मातेरं धान्य घरी खायचं आण चांगलं धान्य असेल ते विकायचं. हे शेतकर्याच्या घरी का असते, हे मला कळेना. हे मला अनेकवेळा सांगितलं. आजपर्यंत आपण शेतकर्याने घरच्या लोकांना मातेरं खाऊ घातलं आणि चांगलं-चांगलं निवडक धान्य, चांगला-चांगला निवडक भाजीपाला, चांगलं-चांगलं दूध बाहेर विकलं. मी तुम्हाला सल्ला देणार आहे. तो सल्ला असा की, याच्यापुढे पहिल्यांदा कमी पिकवा, कमी पिकविण्याचा एक सोपा मार्ग आहे. बाजारामध्ये जाणे बंद करा. बाजारामध्ये खतबीत विकत घ्यायला जाऊ नका. आणि तुमचा मालही विकायलाही जाऊ नका. तुमच्याघरचे दूध तुमच्या पोराबाळांना पाजा. चांगलं अन्नधान्य, सकस जैविक पद्धतीने पिकविलेलं अन्नधान्य आपल्या पोरांना खाऊ घाला. याच्यापुढे त्यांना मातेर्यावर वाढवू नका. आणि जर का तुमच्याकडे अजून बाकी आणखी काही पिकवावं वाटलं, की नुसती एवढी ज्वारी पिकवून आमचं भागणार नाही, तर चांगली ज्वारी फ़क्त तुमच्या कुटूंबापुरती पिकवा. आणि मग जी काही बेकार ज्वारी, रासायनिक खत वगैरे वापरून हायब्रिड ज्वारी पिकवाल ना? त्याच्यासाठी मी एक चांगली युक्ती सांगतो. ती सगळी ज्वारी सुद्धा देशातल्या लोकांना आपण खाया करिता द्यायची नाही. त्या ज्वारीची वासलात मी लावणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून नावं मागविणार आहे. ही सभा झाल्याबरोबर तुम्ही माझ्याकडे नावं पाठवायची आहे. आणि मी त्या विद्यार्थ्यांना,शेतकर्यांना तुमच्या ज्वारीपासून, तुमच्या मक्यापासून तुमच्या भातातून, औरंगाबादला अधिवेशनात आपण जो अभ्यास केला त्याप्रमाणे इथेनॉल किंवा बायोडिझेल, त्याची किंमत आज बाजारात ५५ रुपये लिटर आहे. ते तयार कसं तयार करायचं ही विद्या मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि जर का गचाळ माल तयार करायचा आणि तो लोकांना खायला द्यायचा नाही, या मालाचा आपण पेट्रोल-डिझेल करायचे आहे. आणि चांगल्यापैकी पैसे कमवायचे आहे. आणि चांगलं धान्य मग आपल्या घरी घरच्यांना खाऊ घालायचे आहे. मला एकदा बघायचंच आहे की अजित पवार आणि शरद पवाराचे बच्चे किती वर्ष तग धरतात ते मला एकदा बघायचे आहे. चांगलं पिकवा, सकस अन्नधान्य आपल्या मुलांबायकांना खाऊ घाला आणि बेकार अन्न आपल्याला हरितक्रांतीच्या नावाने हरितक्रांतीच्या नावाने शिकवलं ना? त्याची वासलात लावायची माझ्याकडे सोपी युक्ती आहे. त्याचा आपण पेट्रोल-डिझेल बनवू या आणि जास्त पैसे कमवू या. पण या हरामखोर सरकारला हे धान्य आपण कोणत्याही किंमतीत देणार नाही.
यापलिकडे आणखी काही महत्वाच्या गोष्टी मला आपल्याला इथे शेगावला सांगायच्या आहेत. गजानन महाराजांच्या या तिर्थ क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्य आहे. काहीतरी गजानन महाराजांच्या पुण्याईचा हा भाग आहे. अनेकवेळा लोक मला म्हणतात की हे गजानन महाराजांनी “गण गण गणात बोते” हे काय वाक्य म्हटलं हो? बोना याचा हिंदीत अर्थ म्हणजे पेरणे. “गण गण गणात बोते” याचा अर्थ असा आहे की सर्वांनी जाऊन लोकालोकांमध्ये आपला विचार पेरावा. तुम्ही हा “गण गण गणात बोते” हा मंत्र येथून घेऊन जा आणि तुमच्या सबंध जीवनामध्ये आणि शेतकर्यामध्ये काय क्रांती होते ते बघा. १९८० सालापासून आपण शेतकर्यांच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि ती मान्य झाली. १९९१ साली पी नरसिंहराव पंतप्रधान होते आणि सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिंह तेंव्हाचे अर्थमंत्री होते. तेंव्हा खुल्या व्यवस्थेची घोषणा झाली होती. तेंव्हा आपण याच गजानन महाराजांच्या शेगावात, याच मैदानात जमलो होतो. आणि चतुरंग शेतीचा आदेश आपण दिला होता.
योगायोग आहे, की आज वीस वर्षांनी पुन्हा याच नगरीत आपण जमलो आहोत, मी त्या वेळेसारखा तरूण राहीलो नाही. ती सभा झाल्यानंतर चतुरंग शेतीचा कार्यक्रम आपण फ़ार जोमाने राबविला होता. आज मी एका वेगळया पायरीवर आलो. मी कधीही कोणत्याही आदोंलनामध्ये तुम्हाला अशी गोष्ट करायला सांगीतली नाही की जी मी करायला तयार नव्ह्तो. तुम्हाला कधीही मी जीव धोक्यात घालायला सांगीतले नाही,माझा जीव धोक्यात घातल्याखेरीज. कांद्याच आंदोलन असो, उसाचं आंदोलन असो, आमरण उपोषण करण्याचा धोका मी घेतला. रस्ता बंद करायचा झाला तर रस्त्यावरती किंवा रेल्वेवरती जाऊन बसायचं काम मी केलं. वीज तोडण्याच्या आदोंलनामध्ये S.R.P ची नजर चुकवित पटकन उडी मारून नाहीसे होणे, हे करण्याची शक्ती सुद्धा एकेकाळी माझ्यात होती. आज दुर्दैवाने ती नाही. शंभर वर्षे मी जगावं अशी इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची खरी इच्छा असेल ना, तर शंभर वर्षे मी जगावं ही सोपी गोष्ट आहे.
मी या जिवंतपणी “देखता डोळा” हिंदुस्थानातला सगळा शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहीन, अशी मी प्रतीज्ञा केली आहे. तुम्ही अशी लढाई करा की त्यामुळे मला “ह्या डोळा, देवा देखता” हिंदुस्थानातला शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहू द्या. शंभर नाही, महात्मा गांधीच्या वर एकशे वीस वर्ष मी जगून दाखवतो. पण ही अट आहे की या म्हातार्याचं स्वप्न तुम्ही पुर्ण करा आणि त्याच्या मुळे मला प्रचंड चेतना मिळाणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करा. आता इथे कल्पना मांडली आमच्या युवा संघटनेच्या नेत्याने. निर्यातीची बंधने उठवण्याकरिता काय काय करावं लागेल, त्या करीता या शेगावच्या बैठकीत मी काय काय बदल केला? वीस वर्षा पुर्वीच्या शेतकरी मेळाव्यामध्ये मी चतुरंग शेतीचा कार्यक्रम दिला होता. माजघर शेती, निर्यात शेती, व्यापार शेती आणि सीता शेती, असा चतुरंग कार्यक्रम दिला होता. या चार आकडयाचं काहीतरी मह्त्व आहे. मी या बैठकीमध्ये चार सेनापती इथे नेमलेले आहेत. हे चारही सेनापती तरूण पिढीतील असल्यामुळे मला जे काही करणे शक्य नाही ते त्यांना करता येईल. यापुढे शेतकरी संघटना चालविण्याचे आणि त्याचे आंदोलन चालवण्याचे सर्वाधिकार मी चार लोकांकडे दिले आहेत. त्यांचे नाव मी इथे जाहीर करणार नाही, ते अशाकरिता की जर त्यांची नावे जाहीर केली तर त्यांना इथेच अटक करतील, घरी पोचायचे नाहीत. मला तसं करायचं नाही. हे युद्ध गनिमीकाव्याचे आहे. पण आता इथं अनिल धनवट, आमचे युवा नेते, त्यांनी एक शिफ़ारस केली की आज सुद्धा इथे वेळ नाही, वेळ थांबु शकत नाही, जीव घाबरा होत आहे, एकदा आमचे श्वास मोकळे होऊ द्या आणि जितक्या लवकर शक्य होईल तितकं असं काहीतरी करण्याचा आदेश द्या की ज्यामुळे शेतकरी संघटना ही जिवंत आहे किंवा मृत आहे अशी शंका असणार्यांच्या डोळ्यात अंजन पडेल आणि शेतकरी संघटनेची प्रचंड ताकत पुन्हा एकदा जगाला दिसेल. सर्वसाधारणपणे शेतकरी संघटनेने नवीन आदोंलनाचा आदेश दिला म्हणजे मी विचारतो की कोण यायला तयार आहे. कितीजन तुरुंगात यायला तयार आहे. मी यावेळी हा प्रश्न नाही विचारणार. मी तुम्हाला वेगळ्या तर्हेने मतदान करायला संगणार आहे. आपण लोकशाही मार्गाने जाणारे आहोत. रावेरीला जेव्हा महीला अधिवेशन झालं तेव्हा कपाशीचा प्रश्न अत्यंत बिकट झाला होता आणि कापूस खरेदी होत नव्हती तेव्हा आपण रावेरी अधिवेशन संपल्या संपल्या, सगळ्या अधिवेशनाची लाखोंची संख्या घेऊन रेल्वे लाईनवर आणि रस्त्यावरती बसलो होतो. तो इतीहास पुन्हा एकदा घडवण्याचं मी ठरवलं आहे. आणि अनिलच्या विनंतीप्रमाने या सगळ्या सभेला मी विनंती करतो की, ही सभा संपल्यानंतर या सगळ्या सभेतील बायकांनी,पुरुषांनी,मुलांनी जवळ जो रस्ता तुम्हाला दाखवला जाईल, शेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ जे फ़ाटक आहे तेथे जाऊन आपण सगळ्यांनी रेल्वे अडवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा महिला जातील आणि त्यांना शिस्तीत पहिल्यांदा पुढे जाऊ दिल्यानंतर मग पुरुषांनी तेथे जायचे आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला हा कार्यक्रम संपल्याचा आदेश होत नाही, तोपर्यंत तेथे अत्यंत शांतपणे, कोणत्याही तर्हेचा दंगाधोपा, नासधूस न करता, आपल्या नेहमीच्या शिस्तीने तुम्ही जर का हा कार्यक्रम राबवून दाखवला तर मी असे म्हणेन की मी तुमच्या समोर ज्या कल्पना मांडल्या, की वीज नाही, पेट्रोल नाही, श्रमशक्ती नाही या परिस्थितीमध्ये आपण पीक नियोजनाच्या हत्याराने लढणार आहोत. आणि आवश्यक पडलं तर त्याच्याकरिता आमची जुनी शमिच्या झाडावर ठेवलेली हत्यारे उपसायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही. हे जर तुम्ही दाखवून दिलं तर मी असं समजेन, की तुमची खरोखर इच्छा आहे की, ७५ वर्षे मी तुमची सेवा केली, आणखी २५ वर्षे करावी. याचा पुरावा आज संध्याकाळच्या आत मला दाखवायचा आहे, एवढे बोलतो आणि आपली रजा घेतो
शब्दांकन – गंगाधर मुटे
(शेगावच्या महामेळाव्यात दि. १०-११-२०१० रोजी मा. शरद जोशींनी केलेले भाषण)
…………………………….
प्रथम आपल्या पुस्तकाचं इथे उदघाटन झालं याबद्दल आनंद झाला.
बाकी भाषणातले मुद्दे बरेच पटण्यासारखेच आहेत.
पण उत्स्फूर्तपणा म्हणून रेल्वे अडवली (तिथल्या तिथे!!) यात काय मिळवलं.
कोणी दाद देत नाहीत म्हणून लक्ष वेधून घ्यायला आणि इश्यू करायला रेल्वे अडवल्या जातात.
आधी महिलांना पाठवलं..मग पुरुष.. कोणीही आधी , नंतर गेलं तरी मोटरमनला नाही थांबवता आली गाडी वेळेत तर जीवाला धोका कोणाच्या होता?
सामान्य गरीब शेतकरी/ कष्टकरी नागरिकाच्या.
अडवणूक कोणाची झाली?
सामान्य नागरिक असलेल्या प्रवाशांची.
ज्यासाठी रेल रोको करायला लागला त्याचं मूळ कारण असलेल्यापैकी कोणाला कसला आणि किती त्रास झाला?
शून्य..
“नाही रे” वर्गाची अवस्था आणखी “नको रे” करून सोडणे हीच एक शोकांतिका आहे अशा आंदोलनांची.
माझं मत आदराने आणि प्रांजळपणे देतोय. क्षमस्व..
नाचिकेतजी,
माझ्या गझलेतला एक शेर मला आठवला. जरा या बाजुनेही विचार व्हावा.
“समाजात या हिंस्र भाषा नसावी, नसो स्थान लाठी व काठीस त्या
परी या मुक्यांची कळे भाव-भाषा, असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी”
एकदम सही शब्द आहेत या तुमच्या गझलेतले.
“समाजात या हिंस्र भाषा नसावी, नसो स्थान लाठी व काठीस त्या
परी या मुक्यांची कळे भाव-भाषा, असे ज्ञान सत्तेस दे ना कुणी”
“सत्तेस दे ना कुणी” हे महत्त्वाचं..
सत्तेस..! सामान्य जनांस नव्हे..
वेळ आली की आणि हवे तर जरूर लाठी काठीस स्थान असावे..पण ते सत्तेच्या दारात जाउन..
आपल्यासारख्याच असंख्य जन सामान्यांनी भरलेल्या ट्रेनपुढे नव्हे..
गझलीच्या ओळी खूप आवडल्या सर..
सामान्य माणसांनाही समाजाप्रती काही देणं लागतंय ना?
आपल्याला थोडा त्रास होतो पण त्या बदल्यात करोडो शेतकर्यांना न्याय मिळणार असेल तर त्यात आनंदच वाटून घ्यायला काय हरकत आहे? तसेही आंदोलक रेल्वे ही शासनाची मालमत्ता म्हणून अडवतात. त्यात प्रवाशांना त्रास देणे हा उद्देश नसतोच.
आपल्याला थोडा त्रास होतो पण त्या बदल्यात करोडो शेतकर्यांना न्याय मिळणार असेल तर त्यात आनंदच वाटून घ्यायला काय हरकत आहे?
हो..Agreed.
पण खरंच रेल्वे अडवल्याने न्याय मिळत असेल तर आपले म्हणणे मान्य करुन दिलगिरी व्यक्त करतो.
रेल्वे अडवल्याने सत्ताकेंद्राला एक बारीकसा चरा तरी पडत असेल का याविषयी मला तीव्र शंका आहे.
nachiket aapale mhanane barobar aahe .. pan pani galyaparyant aale tar kaay karnaar .. jitaki prasiddhi aana hazarena milate titkich jar sharad Joshina milali tar paristhiti badlel .. durdaivane Ajit pawar and company SHARAD RAO ya mumbaitil majurya mansala khatpani ghalun purn mumbaila vethis dharate tar mag BALIRAJANE ase aandolan kele tar kaay chukiche …
सर..
रेल्वे अडवली जाते ती सरकारी मालमत्ता म्हणून नव्हे तर अडवणे सोपे, तुलनेत सहज आहे म्हणून.
रास्ता रोकोही करतात. तेव्हा सरकारी गाड्या, एस.टी, खाजगी वाहने, रुग्णवाहिका, मालवाहू ट्रक सगळेच अडकतात. सगळ्यांचंच नुकसान होतं.
प्रत्यक्ष निर्णय घेणारे मंत्री, तहसीलदार, लालफीतशाही करणारे सरकारी बाबू या सर्वापैकी कोणालाच तोशीष लागत नाही. त्यांच्यापर्यंत पोचून, त्यांची गाडी अडवून, त्यांची कॉलर धरणं खूप अवघड आहे.
सामान्य लोकांचं तसं नाही. त्यांना अडवणं सोपं आहे.
सरकार शेतक-यांना वेठेला धरतंय, शेतकरी युनिटी दाखवण्यासाठी सामान्य नागरिकाला वेठीला धरतोय.
आपण आपल्या आपल्यातच गोल गोल फिरतोय.
अर्थातच आपण एका मार्गावर फार पुढे गेले असाल तर हे पटणं अशक्यच आहे. फक्त एक मत नोंदवलं.
काय बोलावं…?!
सादर,
नचिकेत
bhavbandki is the biggest rival of farmers.
i need some information regarding land measurement(mojni) and rules.
i think many farmers suffer from this problem as they don’t know anything about it.They get fulled by officers.I think if everybody will be aware of its rule then atleast some problems of farmers will be reduced..
I am Arvind Shankar Wagaskar(Phulgaon,Pune 9766122119)
email me at arvind.wagaskar@gmail.com
नचिकेतजी,
रेल्वे रोकोच काय, पण कुठल्याही कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणार्या आंदोलनांचं समर्थन केलेच जाऊ शकत नाही आणि मीसुद्धा समर्थन करू इच्छित नाही. पण हे तेंव्हाच; जेंव्हा राजसत्ता आणि राजकीय पुढारी यांच्यात थोडीफ़ार मानवता शिल्लक असेल तरच…!
माझा गेल्या २५ वर्षातला अनुभव आणि आकलन असे सांगते की, गेंड्यासारख्या जाडभरड्या कातडीच्या राजकीय पुढार्यांमध्ये आणि प्रशासकीय अधिकार्यांत संवेदनशिलता नावाची कोणतीही वस्तू शिल्लकच राहीलेली नाही. या सर्वांना फ़क्त आणि फ़क्त तीनच भाषा समजतात.
१) मतांचा गठ्ठा २) नोटांची पेटी किंवा ३) कानाखाली काढलेला आवाज.
कोणतेही काम किंवा मागणी, या तीनपैकी किमान एका मार्गाचा अवलंब केला तरच पुर्णत्वास जाऊ शकते. अन्य मार्ग आजवर मला तरी आढळलेला नाही. कुणी सुचविला तर स्वागतच आहे.
आपली मागणी पुर्ण करून घेण्यासाठी पुढार्यांना किंवा प्रशासकीय अधिकार्यांना देण्यासाठी नोटांची पेटी शेतकर्यांकडे नाही. मतांच्या गठ्ठ्याच्या बळावर तो आपली मागणी पदरात पाडून घेऊ शकत नाही कारण तो सर्वच जातीधर्मात विभागला गेलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांजवळ फ़क्त तिसरा पर्याय उपलब्ध आहे. ४ तास रेल्वे अडवून कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून रेल्वे रोखून ठेवणे ही सरकारला दिलेली सणसणीत चपराकच असते.
सामान्य जनतेला त्रास होतो हे खरे आहे, पण त्याला इलाज नाही. तसेही मार्ग कोणताही वापरा, सामान्य जनतेला निष्कारण होणारा त्रास टळू शकतच नाही. अगदी दोन देशातील युद्धात सुद्धा मोठ्या प्रमाणावर सामान्यजनच मारले जातात. आणि युद्ध करण्याचे/लादण्याचे निर्णय घेणारे त्या-त्या देशातले राज्यकर्ते अगदीच सुरक्षित असतात.
रेल्वे अडवल्याने सत्ताकेंद्राला एक बारीकसा चरा तरी पडत असेल का याविषयी तुम्हाला तीव्र शंका आहे. पण ती रास्त नाही. रेल्वे रोकोचा मुख्यमुद्दा असा होता की शेतकर्यांच्या शेतातील वीज तोडणे थांबावे. शेतकर्यांचा माल नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मार्केटला जातो. आणि वीज मंडळाने सप्टेंबरमध्ये बील भरण्याचा तगादा लावून महाराष्ट्रभर वीज तोडणे सूरू केले. भरीसभर महाराष्ट्र शासणाच्या एका जबाबदार मंत्र्याने “लाखो शेतकर्यांच्या शेतातील वीज तोडण्यास आम्ही मागेपुढे पाहाणार नाही” अशी मग्रूरीपुर्ण भाषा वापरली. या रेलरोकोचं फ़लीत हे की वीज तोडणे थांबले आहे. आणि तो मंत्रीसुद्धा सुतासारखा सरळ होऊन मग्रूरीने बोलणे विसरून गेला आहे.
पण माझ्यामते यातून “नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.” हा जो संदेश जातो, तशी परिस्थिती निर्माण होणे हेच सर्वात जास्त वाईट आहे.
गंगाधर मुटे
………………………………
parinam jhala asel tar faar changli gosht ahe..
जसा रोग, तसा इलाज केला की परिणाम होतोच.
म्हणतात ना की लातो के भूत बातोसे नही मानते.
i also wanted to help farmers as i belongs to farmer’s family..
for that first step is to make them aware of there rights…
please send me rules,and other things necessary for land measurement(Mojni)…
or please write blog detailing information regarding that…
शेतमोजणी/भुमापन या संदर्भात नेमकी काय मदत हवी, या संबधी लिहा. म्हणजे तशी माहिती इथे पोष्ट करता येईल.
i want information such as
1.total money required for that according to different crieteria
2.different laws which are in favor of farmers regarding mojni..
3.if mojni officers do not follow the rules what farmers can do.Do they have any right to go against them.
4.sometimes mojniwale mojni n karata nighun jatat v shetkaryana punha paise bharave lagtat ashyaveli kay kel pahije.
5.punyat shetkaryanchi takrar sodvanyasathi konachi madat milel…
as farmers dont have much information about it they get feared of that.Also officers do not behave properly and takes bribe.
नोव्हेंबर महिन्यात करावयाची शेतीचे कामे