शेतकरी पात्रता निकष.
एक प्रश्न :- शिरीष(मायबोलीवर) यांनी “एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल – आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारिरीक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा – प्लीज! “असा प्रश्न विचारला आहे. त्याबद्दल थोडेसे…..
……………………………………………………………..
या प्रश्नाचे उत्तर फारच अवघड आहे.असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नाही.”इधरसे बाहर निकलनेका रस्ता है,अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही”.
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले,कामातुनच गेले,मातीमोल झाले.
हे जर मला माहीत असेल तर मी काय माहीती द्यावी? आम्ही कवी माणसं.कविता करतांना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डान घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पुर्ण करतो.पण जित्याजागत्या जिवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे. तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?
अ) हौसेखातर शेती. (उपजिविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचन नाही.घरात दोन पिढ्या जगतील ऐवढी संपत्ती असेल,पुढारीगिरी करुन माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असुन पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगुण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पाढर्यात रुपांतरीत करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजिविकेसाठी शेती.
उदरभरनासाठी शेती ( उदरभरन हाच शब्द योग्य.लाईफ बनविने,करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतु आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थीक खर्चाची यादी करू.अंदाजे किंमतीसह.
१) १० एकर शेतजमीन………२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ………………..२०,०००=००
२) विहीर पंप :…………………१,५०,०००=००
३) शेती औजारे :………………. ३०,०००=००
४) बैल जोडी :………………….. ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :…………… १,००,०००=००
६) साठवणूक शेड :…………..१,००,०००=००
———————————————–
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
———————————————–
सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणुक करावी लागेल.
शारिरीक गरजा :
१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिण्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळाभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावुन पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहुन नेण्याची क्षमता असावी.
मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच ” रघुपती राघव राजाराम” हे गित घरासामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता……राम नाम सत्य है…
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगिभुत गुण असावा कारण प्रत्येक ठीकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणुन दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जिवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार – बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर – पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळुन गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईनते करुन घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहीजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावुन घ्यायचे.म्हणुन मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कुलर,फ्रीज,टिव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शिन-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.
कायदेशिर गरजा:-
कायदेशिर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकिल मंडळीकडून घेता येतो.
माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवुन घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्किच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहानी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम…..!
पोशिंद्याचा विजय असो….!!
. गंगाधर मुटे
==================================
वांगे अमर रहे या लेखावर आज पंकज यांची एक प्रतिक्रिया आली ती खालीलप्रमाणे…
……………………………………………………….
बटाटा अमर रहे ! …….
मुटे साहेब आज प्रामाणिक पणे वाटते की शेतीला आयकर नसावा…
काल ७०१० रु. ला आठ क्विंटल बटाटा मोडून आलोय.
संपूर्ण उत्पादन खर्च १०,६०० रु आला होता.
१०,६०० – ७०१० = ३५९० येवढा तोटा झाला.
पण कमी तोटा झाल्याबद्दल वडील थोडेसे समाधानी होते. इतर लोकांचा तोटा ऐकुन फार वाइट वाटले…
अर्थात एक एकर बटाटा निदान १५ क्विंटल निघेल आणि दर सरासरी १२ रु किलो मिळेल अशी अपेक्षा होती (म्हणजे साधारण १८००० रु). बटाटा पुण्याला आणणार होतो. त्यामुळे वडिल गावाकडून टेंपो पाठवून देणार होते आणि मी येथे व्यवहार करणार होतो. पण प्रत्येक्षात उत्पादन कमी मिळाल्यामुळे माल तिकडेच विकुन टाकला…
……………………………………………………….
20.556141
78.838242