अंदाजपत्रक – डोंगर पोखरला, उंदीर कोठे आहे?

(Sharad Joshi’s reaction on the General Budget 2013-14)

अंदाजपत्रक – डोंगर पोखरला, उंदीर कोठे आहे?  

     
                                                               – शरद जोशी

                           अंदाजपत्रक लोकसभेत सादर होण्यापूर्वी त्यासंबंधी वेगवेगळ्या स्तरांवर वादळी चर्चा होतात. अंदाजपत्रकाकडून अपेक्षा काय आहेत यासंबंधीच्या या वादळी चर्चा आजकाल प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडियावर पहायला मिळतात. वस्तुस्थिती अशी आहे की, वार्षिक अंदाजपत्रक हे पंचवार्षिक योजनेच्या चौकटीत बसवावे लागत असल्यामुळे ते काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी घडवून आणणारे साधन रहिलेले नाही. खुद्द पंचवार्षिक योजनाच त्या दृष्टीने कितपत महत्त्वाची राहिली आहे हा एक प्रश्नच आहे. अंदाजपत्रकात प्रामुख्याने, सध्याच्या परिस्थितीत, सत्ताधारी पक्ष काय योजना देऊन कोणत्या गटाला खूश करण्याचा प्रयत्न करतो आहे याबद्दलच मोठे कुतुहल असते.

                           सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये अंदाजपत्रकीय तूट आणि वित्तीय तूट – दोन्हीही वाढल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारही तुटीतच चालू आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीचाच हा परिणाम आहे. त्यामुळे, भारतातही वित्तमंत्री आर्थिक विकासाचा दर कोणत्या पातळीवर ठेवतात यासंबंधीही एक सार्वत्रिक कुतुहल असते. या विषयावर लिहायचेच झाले तर समाजवादाच्या काळात आपण तीन टक्के या ‘हिंदु रेट ऑफ ग्रोथ’ वर सीमित राहिलो, विकासाच्या दोन अंकी वाढीच्या गतीपर्यंत आपण १९९१च्या आर्थिक सुधारांनंतरच जाऊ शकलो असे लिहावे लागेल. हा आर्थिक सुधाराचा कार्यक्रमही कारखानदारी आणि वित्तीय क्षेत्रापुरताच मर्यादित होता. त्यामुळे, त्याच्याशी संबंधित असलेल्या गणकयंत्राधारित इत्यादि सेवा यांनाही मोठी चालना मिळाली. परंतु, अद्याप आर्थिक सुधारांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक विकासाच्या गतीचा ८ ते ९ टक्क्यांचा जो दर आपण एकदा गाठला होता त्याच्या पलीकडे बघण्याची दृष्टी कोणत्याही राजकीय पक्षाजवळ दिसत नाही.

                           शेतीवरील सर्व बंधने उठवली आणि आर्थिक सुधाराचे कार्यक्रम शेतीला लागू झाले तर चीनप्रमाणे भारतातसुद्धा आर्थिक विकासाचा दर १३ ते १४ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. दुर्दैवाने, आपण समाजवादाच्या काळातील तीन टक्के आणि आर्थिक सुधारांनंतरचे आठनऊ टक्के या आकड्यांदरम्यानच घोटाळत आहोत. या कोंडीतून सुटण्याची हिंमत वित्तमंत्र्यांनी या अंदाजपत्रकाततरी दाखविलेली नाही. आठ टक्के वाढीच्या स्वप्नाकडेच ते अजून आशाळभूतपणे दृष्टी टाकीत आहेत असे दिसते. तसे नसते तर त्यांनी ‘आर्थिक सर्वेक्षण २०१२-१३’ मध्ये सूचित केल्याप्रमाणे साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्यासाठी डॉ. रंगराजन समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचे संकेत आपल्या या अंदाजपत्रकात दिले असते. पण त्यांनी आर्थिक सर्वेक्षणातील सूचनेचा आणि रंगराजन समितीच्या शिफारशींचा साधा उल्लेखही केला नाही. कदाचित त्यांनी तो निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर वापरण्यासाठी हातचा राखून ठेवला असावा.  >>>  पुढे वाचा >>>  http://www.baliraja.com/node/453
*********************************************************************** 


शरद जोशींचे भाषण

शरद जोशी

शेगाव महामेळाव्यात भाषण करताना शरद जोशी.


……………………………….
प्रस्तावित सिलींग कायदा हेच शेतीवरचे मोठे संकट
                                                                           शरद जोशी

                या मंचावर उपस्थित असलेले आंध्रप्रदेश,हरयाना,कर्नाटक या राज्यांचे शेतकरी प्रतिनिधी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या महिला शेतकरी भावांनो आणि मायबहिनींनो, मी तुम्हाला पहिल्यांदा प्रणाम अशासाठी करतो की गेली सहा वर्षे मी राज्यसभेचा खासदार असल्यामुळे शेतकरी संघटनेचं हे सगळं वैभव पाहण्याची संधी मला मिळाली नव्हती. फ़ार फ़ार वर्षांनी पुन्हा एकदा सबंध मैदान गच्च भरलेली शेतकर्‍यांची सभा पुन्हा माझ्या डोळ्यांनी पाहिली आणि माझे डोळे तृप्त झाले. गेल्या ८-१० दिवसातली बातमी आहे, वर्ध्यासारख्या ठिकाणी गांधीचं नाव घेऊन सोनिया गांधी स्वत: येत असताना कोट्यावधी रुपये जमा झाल्याखेरीज १०-२० हजाराची सभा कॉंग्रेसला जमा करता येत नाही. आणि येथे केवळ वर्तमानपत्रामध्ये निरोप देऊन लाखाच्या वरची सभा येथं जमते, तुम्हाला सगळ्यांना मी शतश: प्रणाम करतो.
                     मघापासून मी बघतो आहे, कधी इकडचा एखादा मनुष्य,कधी तिकडचा, कधी दोनचार इकडचे तिकडचे उठून मागे वळून पाहताहेत. जशी एखादी अत्यंत रुपवती सुंदर मुलीला आपण खरंच किती सुंदर आहो, त्याचा अंदाज घेण्याकरिता आरशाच्या समोर उभे राहून मागे वळून वळून पाहावंसं वाटतं, तसंच शेतकरी उभे राहून वळून मागे पाहात आहेत की, आपली गर्दी केवढी आहे. तुमचे सगळ्यांचे मी शतश: आभार मानतो. आणि त्याच्या बरोबर मी तुमची क्षमा मागतो. क्षमा अशाकरिता मागतो की, तुमच्या सगळ्यांच्या समोर मी प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत हिंदुस्थानातला सगळा शेतकरी संपूर्णत: कर्जमुक्त होत नाही – त्यात छोटा नाही,मोठा नाही,उसाचा नाही,कापसाचा नाही,सगळा शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही- तोपर्यंत कोणत्याही तर्‍हेचा सत्कार, कोणत्याही तर्‍हेचा हार, कोणत्याही तर्‍हेचा सन्मान मी स्विकारणार नाही, अशी मी तुमच्यासमोर शपथ घेतली होती. तुम्ही गेले दोन तास येथे बघताहात, इथे काय काय कार्यक्रम झाला आणि तुम्ही मनामध्ये प्रश्न विचारला असाल की शरद जोशींनी सत्कार घेणार नाही अशी शपथ घेतली होती, आणि इथे तर सत्कारच सत्कार चालू आहे. खरं आहे काय? 
                       प्रतापसिंह यांनी शपथ घेतली होती की, जोपर्य़ंत चित्तोडचा किल्ला माझ्या हाती पुन्हा येत नाही तोपर्य़त मी गादीवर झोपणार नाही. प्रतापसिंह निघून गेले आणि मग त्यांच्या वंशज़ांनी नावापुरत्या गादीच्या खाली २-४ गवताच्या काड्या टाकून झोपायला सुरुवात केली, तसं काही शेतकरी संघटनेच्या बाबतीत होते की काय, अशी तुमच्या मनात शंका आली असेल. म्हणून भाषणाच्यापुर्वी मी तुम्हाला स्पष्ट करतो की, शेतीमालाला भाव मिळवून देणे आणि शेतीमालाला भाव मिळू नये याच्याकरिता जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर जी जी काही अडथळे, जी जी काही बंधने घातली जातात, ती,त्या बंधनांचा प्राणपणाने विरोध करण्याची शपथ, मी संघटनेत घेतलेली प्रतिज्ञा आजही जशीच्या तशी शाबूत आहे. आणि तितक्याच वेगाने आता मी अमंलात आणणार आहे.
        विचित्र गोष्ट अशी आहे की, इथे बोलतांना अनेकांनी सांगीतलं की महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांसमोर फ़ार गंभीर प्रश्न उभे आहेत. तुमची वीज तोडून टाकणार असं उर्मटपणे मंत्री बोलतात आणि त्याच्याबरोबर दुसरा एक मंत्री दिल्लीहून सांगतो की आता तुमच्या डिझेलचा भाव दुप्पट तिप्पट होणार आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये शेतमजुरीचा दर जेव्हा शेतकरी संघटना चालू झाली होती तेंव्हा ३ रुपये होता. आज १५० रुपये रोजाच्या खाली कुठेही मजूर मिळत नाही. सगळ्या शेतमजुराची ही जी काही उन्नती झाली आहे,त्याचं श्रेय्य एकट्या शेतकरी संघटनेकडे आहे, हे मी तुम्हाला सांगतो.पण वीज नाही, औषध खत नाही, खत घ्यायला गेलं तरी ते सुद्धा विकत मिळत नाही. मजुरीचा दर १५० रुपयाच्यावर, शेती कशी करायची? हा मोठा गंभीर प्रश्न सगळ्या शेतकर्‍यांसमोर आहे. निर्यातीच्या बंधनामुळे कापसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, उसाच्या भावाचा एक वेगळा प्रश्न आहे, आणि हे सगळं असतांना सभेच्या दोन–अडीच तासापैकी दिड तास केवळ सत्कारावरती वापरला गेला, याच्या बद्दल मी तुमची सगळ्यांच्या वतीने क्षमा मागतो. माझ्या सहकार्‍यांनी सत्काराचा एवढा घाट घातला, त्याची भावनाही थोडी मी समजून घेतो,थोडी तुम्ही समजून घ्या. यांनी माझ्याबरोबर गेली २५ वर्ष काम केलं आहे, माझ्याबरोबर ते तुरुंगात गेले आहे, घरादाराचा कधीही विचार केला नाही, शरद जोशींनी हाक दिली की घर सोडून ते पिसाटासारखे बाहेर आले आहेत. त्यांच्या माझ्याविषयी काही व्यक्तिगत भावना आहेत, आणि मी त्यांना कितीही सांगीतलं, कोणत्याही प्रकारचा सत्कार करू नये, तरी त्यांची अशी बुद्धी होते की, आपल्या भावनेला कुठेतरी वाचा फ़ुटली पाहीजे, म्हणून त्यांच्या हस्ते ही आगळीक घडली, त्यांना आपण क्षमा करावी, मी त्यांना क्षमा केली आहे.
                        हिंदुस्थानतल्या सगळ्या शेतकर्‍यांसमोर वेगळे-वेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांचे जे प्रश्न सांगीतले त्या प्रश्नामध्ये वीज तोडण्याचा प्रश्न, धानाचा भावाचा प्रश्न, कपाशीच्या भावाचा प्रश्न व उसाच्या भावाचे प्रश्न सांगीतले. आम्ही आताच किसान समन्वय समितीची भली मोठी एक दिवसभराची बैठक घेतली, तिच्या मध्ये आणखी काही वेगळे प्रश्न आले आणि अद्यापपर्यंत या सगळ्या सभेमध्ये कोणीही न मांडलेला मुद्दा मी तुमच्यासमोर मांडतो. कदाचित तुम्ही त्याच्याबद्दल वाचलं नसेल. जे शेतकरी संघटक वाचतात त्यांना त्याचा थोडाफ़ार अंदाज असेल. पण काही वर्षापुर्वी, ४० ते ५० वर्षापुर्वी भारत सरकारने आणि राज्य सरकारने, सगळ्या शेतकर्‍यांच्या जमिनीवरती सिलींग लादण्याचा कायदा केला होता, ते तुम्हाला आठवत असेल, १८ एकर आणि ५४ एकर. आता केंद्र सरकार एक नवीन कायदा करित आहे आणि त्या कायद्यामध्ये आता १८ एकर नाही, ५४ एकर नाही, जास्तीत जास्त जमीनधारणा ही बागायती क्षेत्राकरीता २ एकराची आणि कोरडवाहू क्षेत्राकरीता फ़क्त ५ एकराची असणार आहे. हे दोन आकडे तुम्ही लिहून घ्या. मनाशी विचार करा की, ज्या लोकांनी तुम्हाला खर्‍या शेतकर्‍याचे नेते आपणच आहोत, म्हणून गावोगाव पोस्टर लावली, तेच लोक आता शेतकर्‍याला २ एकरापेक्षा जास्त एकर जमीनधारणा करता येऊ नये, अशा तर्‍हेचा कायदा आणणार आहे. 
                      पंडीत जवाहर नेहरू जिवंत असताना एकदा त्यांनी असा प्रयत्न केला होता.  आणि ज्या पक्षाचा वारसदार स्वतंत्र भारत पक्ष आहे, त्या स्वतंत्र पक्षाने आणि चक्रवर्ती राजगोपालाचारींनी नागपूर कॉंग्रेसमध्ये त्यांचा बेत हाणून पाडला होता. तुमच्या शेतीवरती जी संकटे येत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं,सगळ्यात मोठं संकट कोणतं असेल तर पुन्हा एकदा दुसर्‍यांदा येणारा हा जमीन धारणाकायदा असणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला आज जी काही लढाई करायची असेल ती करा, धानाकरीता करा, उसाकरीता करा, कापसाकरीता करा, पण उद्या तुमची जमीनच राहिली नाहीतर तुम्ही शेतकरीच कसे राहणार? तेव्हा मुख्य जी तुमची ताकत लावायची आहे ती शेतकर्‍याच्या जमीनीचं राष्ट्रीयीकरण होऊ नये, शेतकर्‍याला जमीन ठेवण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याची वासलात लावण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याच्याकरीता आपल्याला लढाई द्यावी लागणार आहे आणि मी देखील आता इथे झालेली पुष्कळशी भाषणं ऐकली, तरूण मंडळींनी मोठ्या जोषात भाषणं केलीत, मी तुम्हाला सांगणार आहे की, शेतकरी संघटनेने कधीही त्वेषपूर्ण व जोषपूर्ण भाषणांवर विश्वास ठेवला नाही. 
                     शेतीच्या परिस्थितीचा शांतपणे विचार करावा, हिशेब मांडावेत, आपलं काय चुकत आहे याचा हिशेब मांडावा, पिक काढण्याकरिता आपल्याला काय खर्च येतो आणि आपल्याला  मिळतं काय? याचाही हिशेब मांडावा, आणि असा शांत डोक्याने हिशेब मांडून मग काय आंदोलन करावं त्याचं अर्थशास्त्र मांडावं, हा शेतकरी संघटनेनी गेली २५-३० वर्ष तुम्हाला दिलेला संदेश आहे. गेली २५-३० वर्ष सतत शेतकरी संघटनेनी केलेली भाकितं खरी ठरली. ते आता उस कारखाण्याविषयी बोलत आहे. पण उस कारखाने सगळी बुडणार आहेत, हे भाकित शेतकरी संघटनेने २५ वर्षापुर्वी केलं. कापूस एकाधिकार हा शेतकर्‍यांच्या शोषणाचं षडयंत्र आहे, हे कापूस एकाधिकार बंद झाला पाहिजे ही मागणी शेतकरी संघटनेने केली होती. मी काही जोतिषी नाही, मी काही भविष्यवेत्ता नाही आणि तरीही माझ्या तोंडून निघालेली ही भाकितं २५-२५ वर्षांनी का होईना,पण १०० टक्के खरी ठरतात. याचं कारण असं की आम्ही मनामध्ये कोणत्याही तर्‍हेचा राग द्वेष येऊ न देता, प्राप्त परिस्थितीचा शांतपणे विचार केला आणि शांतपणे विचार करून मार्ग काढला. आणि म्हणून जे राजस्थानातल्या प्रतापसिंहाना जमले नाही, जे हरयानातल्या जाटांना सुद्धा जमले नाही, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे महाराष्ट्रात करून दाखविले. कारण गनिमी काव्याची लढाई आणि शांत डोक्याची लढाई महत्वाची असते.   
                    मी तुम्हाला पहिल्यांदा एक सल्ला देणार आहे की सगळी भाषणे झाली, कृतीमध्ये आपण कोठे कमी पडणार नाही, पण कृती करताना आणि जहाल कृती करताना सुद्धा डोक्याची शांती कधीही घालवू नका, आपल्याला आंदोलन करताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती ही की, सरकार म्हणतं की सगळ्यांना खायला मिळालं पाहिजे, अन्नधान्य अधिक पिकवा, पण त्याच्यामध्ये एक मंत्री बेमुर्वतखोरपणे म्हणतो की, आम्ही तुमची वीज कापणार आहो, आणि वीज कापण्याकरीता तुमच्या गावात सुद्धा कोणी मनुष्य येणार नाही. का? आमच्या वीज कंपनीचा कोणी मनुष्य गावातली वीज कापायला आला तर तुमच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या त्याच्या विजेच्या खांबावरती तो चढला म्हणजे त्याच्या खालती त्या आग लावून देतात. म्हणून तुमच्या गावात आम्ही कोणाला पाठवणार नाही. आम्ही काय करणार? तालूक्याच्या गावी किंवा त्याच्या पलिकडे जिथे आमचा ट्रांन्सफ़ार्मर आहे, ते आम्ही ट्रांन्सफ़ार्मर काढून नेणार, तुमच्या गावात यायला नको, तुमची वीज आम्ही तोडतो. याला वाटतं आपण खूपचं शहाणपण आणि युक्ती वापरली. आपण गनिमीकावा केला पण या गनिमीकाव्यापेक्षा सरस गनिमीकावा शेतकरी संघटनेकडे आहे. तू वीज कोणती कापणार? जी वीज तुझ्या साठ्यात राहील तीच ना? पण त्या साठ्यातली वीज येते कुठून? ती वीज येते आमच्या विदर्भातून. मघाशी जी जी भाषणं झाली वामनरावांनी भाषण केलं, रवि देवांगनी भाषण केलं. मी त्यांना सांगतो, तुम्हाला माझं वय ७५ झालं काय, १०० झालं काय, याचं काहीच देणंघेणं नाही. परंतू जर का तुमची वीज कापण्याकरीता तालुक्याच्या पातळीवरून ट्रांन्सफ़ार्मर हलवणारा तो शेतकर्‍याचा मुलगा आहे की नाही, मला शंका आहे. जर का कोणी असं करायला लागला तर ज्या मिळेल त्या मार्गाने विदर्भातली वीज महाराष्ट्रात जाणार नाही, याची जमेल त्या मार्गाने काळजी घ्या. कोणताही मार्ग वापरा. पण एवढ्याने लढाई संपणार नाही. तुम्ही धान्य वाढवावं, पिक वाढवावं, असं सरकारला वाटतं. पण तुम्हाला वीज मात्र मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, खतं मिळणार नाही, औषध मिळणार नाही, अशा तर्‍हेने सगळ्या शेतकर्‍यांना कोंडीत घालण्याचा प्रयत्न चाललाय. वीज नाही, औषध नाही, खतं नाही, बियाणही मिळणं कठीण आहे. एवढंच नव्हे तर तुमची जमीन सुद्धा फ़क्त २ एकर तुमच्याकडे राहील. मघाशी एक मुद्दा मी सांगायचा विसरलो, तो पुन्हा सांगतो, त्या कायद्यामध्ये तरतुद आहे की आता आम्ही हे जे नवीन नियम ठरवले. २ एकराचा आणि ५ एकराचा. ४० वर्षापुर्वी १८ एकर आणि ५४ एकर ठरलं. पण या कायद्याचा अमंल आता आम्ही ४० वर्षापुर्वीपासून घेणार आहोत. म्हणजे ४० वर्षापुर्वी तुमची जमीन किती होती? त्यावेळी जर का तुमच्याकडे जमीन जर समजा १०० एकर असेल, त्याच्यातली तुमच्याकडे १८ एकर राहीली. ८२ एकर त्यांनी काढून घेतली. आता तुमच्याकडे जी जमीन उरली त्याचा हिशेब लक्षात घेता, तुमच्याकडे फ़क्त २ एकर ठेवून ९८ एकर जमीन तुमच्याकडून काढून घ्यायची आहे. आणि याचा अर्थ असा की तुमच्याकडे आता जर जमीन राहीली नसेल, ही जी १८ एकर होती त्यापैकी सुद्धा काही जमीन तुम्ही काही विकून टाकली असेल तर काय करायचं? जुन्या काळी लेव्हीची व्यवस्था होती आणि तुमच्याकडनं ज्वारीची पोती घेऊन जायला सरकारी अधिकारी यायचे आणि तुमच्या घरी जर का लेव्ही घालायला ज्वारी नसली तर तुम्ही बाजारातून ज्वारी महागात विकत आणायची आणि ती स्वस्त भावात लेव्ही घालायची. हा मुर्खपणा तुम्ही केलाय ना? सरकारचं म्हणणं आहे की आता तुम्ही तेच करा. तुमच्याकडनं आम्ही जमीन काढून घेणार आहोत तेंव्हा त्याच्याकरिता पाहिजे तर बाजारातून नवीन जमीन विकत घ्या आणि आम्हाला द्या. ही केवढी भयानक गोष्ट आहे? याचा फ़क्त तुम्ही विचार करा. या परिस्थितीमध्ये आपल्याला डोकं शांत ठेवून शेती करायची आहे आणि मी तुम्हाला अशी विनंती करतो की, ह्या करीता काही शिस्त शिकावी लागेल. ही कल्पना मी काही पहिल्यांदा मांडतो आहे असे नाही. परभणीच्या अधिवेशनात मी मांडली होती. आम्ही वाटेल तितकं पिकवू. आणि त्या सगळ्या पिकाला आम्ही मागू तो भाव मिळाला पाहिजे, हे जगामध्ये शक्य नाही. कोणत्याही बाजारपेठे मध्ये हे शक्य नाही. ज्याला आपल्या पिकाचा भाव मिळवायचा आहे त्याला पिकाचं नियंत्रण करायला पाहिजे. तुमच्या घरची पोरं जशी हुशार व्हावी तर कुटूंबनियोजन केलं पाहिजे. तसं पीक नियोजन केल्याशिवाय तुम्हाला आता गत्यंतर नाही. कुटूंबनियोजनासारखं “हम दो, हमारे दो” सारखं आता आपल्याला पीक नियोजन करावं लागेल. आणि सोपी गोष्ट. मी जेंव्हा शेतकरी संघटनेचं काम चालू केलं तेंव्हा मला आठवतं की आमच्या एक कार्यकर्त्या शैलाताई देशपांडे, माहेरघर शहरातलं, लग्न झालं शेतकर्‍याच्या घरी. आणि त्या म्हणाल्या की पहिल्यांदा मला असं आश्चर्य वाटलं की, शेतकर्‍याच्या घरी खूप धान्य असतं पण शेतकर्‍याच्या घरी मात्र खातांना मातेरं धान्य घरी खायचं आण चांगलं धान्य असेल ते विकायचं. हे शेतकर्‍याच्या घरी का असते, हे मला कळेना. हे मला अनेकवेळा सांगितलं. आजपर्यंत आपण शेतकर्‍याने घरच्या लोकांना मातेरं खाऊ घातलं आणि चांगलं-चांगलं निवडक धान्य, चांगला-चांगला निवडक भाजीपाला, चांगलं-चांगलं दूध बाहेर विकलं. मी तुम्हाला सल्ला देणार आहे. तो सल्ला असा की, याच्यापुढे पहिल्यांदा कमी पिकवा, कमी पिकविण्याचा एक सोपा मार्ग आहे. बाजारामध्ये जाणे बंद करा. बाजारामध्ये खतबीत विकत घ्यायला जाऊ नका. आणि तुमचा मालही विकायलाही जाऊ नका. तुमच्याघरचे दूध तुमच्या पोराबाळांना पाजा. चांगलं अन्नधान्य, सकस जैविक पद्धतीने पिकविलेलं अन्नधान्य आपल्या पोरांना खाऊ घाला. याच्यापुढे त्यांना मातेर्‍यावर वाढवू नका. आणि जर का तुमच्याकडे अजून बाकी आणखी काही पिकवावं वाटलं, की नुसती एवढी ज्वारी पिकवून आमचं भागणार नाही, तर चांगली ज्वारी फ़क्त तुमच्या कुटूंबापुरती पिकवा. आणि मग जी काही बेकार ज्वारी, रासायनिक खत वगैरे वापरून हायब्रिड ज्वारी पिकवाल ना? त्याच्यासाठी मी एक चांगली युक्ती सांगतो. ती सगळी ज्वारी सुद्धा देशातल्या लोकांना आपण खाया करिता द्यायची नाही. त्या ज्वारीची वासलात मी लावणार आहे. मी तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यातून नावं मागविणार आहे. ही सभा झाल्याबरोबर तुम्ही माझ्याकडे नावं पाठवायची आहे. आणि मी त्या विद्यार्थ्यांना,शेतकर्‍यांना तुमच्या ज्वारीपासून, तुमच्या मक्यापासून तुमच्या भातातून, औरंगाबादला अधिवेशनात आपण जो अभ्यास केला त्याप्रमाणे इथेनॉल किंवा बायोडिझेल, त्याची किंमत आज बाजारात ५५ रुपये लिटर आहे. ते तयार कसं तयार करायचं ही विद्या मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि जर का गचाळ माल तयार करायचा आणि तो लोकांना खायला द्यायचा नाही, या मालाचा आपण पेट्रोल-डिझेल करायचे आहे. आणि चांगल्यापैकी पैसे कमवायचे आहे. आणि चांगलं धान्य मग आपल्या घरी घरच्यांना खाऊ घालायचे आहे. मला एकदा बघायचंच आहे की अजित पवार आणि शरद पवाराचे बच्चे किती वर्ष तग धरतात ते मला एकदा बघायचे आहे. चांगलं पिकवा, सकस अन्नधान्य आपल्या मुलांबायकांना खाऊ घाला आणि बेकार अन्न आपल्याला हरितक्रांतीच्या नावाने हरितक्रांतीच्या नावाने शिकवलं ना? त्याची वासलात लावायची माझ्याकडे सोपी युक्ती आहे. त्याचा आपण पेट्रोल-डिझेल बनवू या आणि जास्त पैसे कमवू या. पण या हरामखोर सरकारला हे धान्य आपण कोणत्याही किंमतीत देणार नाही.
                         यापलिकडे आणखी काही महत्वाच्या गोष्टी मला आपल्याला इथे शेगावला सांगायच्या आहेत. गजानन महाराजांच्या या तिर्थ क्षेत्रामध्ये एक वैशिष्ट्य आहे. काहीतरी गजानन महाराजांच्या पुण्याईचा हा भाग आहे. अनेकवेळा लोक मला म्हणतात की हे गजानन महाराजांनी “गण गण गणात बोते” हे काय वाक्य म्हटलं हो? बोना याचा हिंदीत अर्थ म्हणजे पेरणे. “गण गण गणात बोते” याचा अर्थ असा आहे की सर्वांनी जाऊन लोकालोकांमध्ये आपला विचार पेरावा. तुम्ही हा “गण गण गणात बोते” हा मंत्र येथून घेऊन जा आणि तुमच्या सबंध जीवनामध्ये आणि शेतकर्‍यामध्ये काय क्रांती होते ते बघा.    १९८० सालापासून आपण शेतकर्‍यांच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि ती मान्य झाली. १९९१ साली पी नरसिंहराव पंतप्रधान होते आणि  सध्याचे पंतप्रधान मनमोहनसिंह तेंव्हाचे अर्थमंत्री होते. तेंव्हा खुल्या व्यवस्थेची घोषणा झाली होती. तेंव्हा आपण याच गजानन महाराजांच्या शेगावात, याच मैदानात जमलो होतो. आणि चतुरंग शेतीचा आदेश आपण दिला होता.
                      योगायोग आहे, की आज वीस वर्षांनी पुन्हा याच नगरीत आपण जमलो आहोत, मी त्या वेळेसारखा तरूण राहीलो नाही. ती सभा झाल्यानंतर चतुरंग शेतीचा कार्यक्रम आपण फ़ार जोमाने राबविला होता. आज मी एका वेगळया पायरीवर आलो. मी कधीही कोणत्याही आदोंलनामध्ये तुम्हाला अशी गोष्ट करायला सांगीतली नाही की जी मी करायला तयार नव्ह्तो. तुम्हाला कधीही मी जीव धोक्यात घालायला सांगीतले नाही,माझा जीव धोक्यात घातल्याखेरीज. कांद्याच आंदोलन असो, उसाचं आंदोलन असो, आमरण उपोषण करण्याचा धोका मी घेतला. रस्ता बंद करायचा झाला तर रस्त्यावरती किंवा रेल्वेवरती जाऊन बसायचं काम मी केलं. वीज तोडण्याच्या आदोंलनामध्ये S.R.P ची नजर चुकवित पटकन उडी मारून नाहीसे होणे, हे करण्याची शक्ती सुद्धा एकेकाळी माझ्यात होती. आज दुर्दैवाने ती नाही. शंभर वर्षे मी जगावं अशी इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची इच्छा तुम्ही व्यक्त केली. तुमची खरी इच्छा असेल ना, तर शंभर वर्षे मी जगावं ही सोपी गोष्ट आहे. 
                          मी या जिवंतपणी “देखता डोळा” हिंदुस्थानातला सगळा शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहीन, अशी मी प्रतीज्ञा केली आहे. तुम्ही अशी लढाई करा की त्यामुळे मला “ह्या डोळा, देवा देखता” हिंदुस्थानातला शेतकरी कर्जमुक्त झालेला पाहू द्या. शंभर नाही, महात्मा गांधीच्या वर एकशे वीस वर्ष मी जगून दाखवतो. पण ही अट आहे की या म्हातार्‍याचं स्वप्न तुम्ही पुर्ण करा आणि त्याच्या मुळे मला प्रचंड चेतना मिळाणार आहे. त्यासाठी काय वाटेल ते करा. आता इथे कल्पना मांडली आमच्या युवा संघटनेच्या नेत्याने. निर्यातीची बंधने उठवण्याकरिता काय काय करावं लागेल, त्या करीता या शेगावच्या बैठकीत मी काय काय बदल केला? वीस वर्षा पुर्वीच्या शेतकरी मेळाव्यामध्ये मी चतुरंग शेतीचा कार्यक्रम दिला होता. माजघर शेती, निर्यात शेती, व्यापार शेती आणि सीता शेती, असा चतुरंग कार्यक्रम दिला होता. या चार आकडयाचं काहीतरी मह्त्व आहे. मी या बैठकीमध्ये चार सेनापती इथे नेमलेले आहेत. हे चारही सेनापती तरूण पिढीतील असल्यामुळे मला जे काही करणे शक्य नाही ते त्यांना करता येईल. यापुढे शेतकरी संघटना चालविण्याचे आणि त्याचे आंदोलन चालवण्याचे सर्वाधिकार मी चार लोकांकडे दिले आहेत. त्यांचे नाव मी इथे जाहीर करणार नाही, ते अशाकरिता की जर त्यांची नावे जाहीर केली तर त्यांना इथेच अटक करतील, घरी पोचायचे नाहीत. मला तसं करायचं नाही. हे युद्ध गनिमीकाव्याचे आहे. पण आता इथं अनिल धनवट, आमचे युवा नेते, त्यांनी एक शिफ़ारस केली की आज सुद्धा इथे वेळ नाही, वेळ थांबु शकत नाही, जीव घाबरा होत आहे, एकदा आमचे श्वास मोकळे होऊ द्या आणि जितक्या लवकर शक्य होईल तितकं असं काहीतरी करण्याचा आदेश द्या की ज्यामुळे शेतकरी संघटना ही जिवंत आहे किंवा मृत आहे अशी शंका असणार्‍यांच्या डोळ्यात अंजन पडेल आणि शेतकरी संघटनेची प्रचंड ताकत पुन्हा एकदा जगाला दिसेल. सर्वसाधारणपणे शेतकरी संघटनेने नवीन आदोंलनाचा आदेश दिला म्हणजे मी विचारतो की कोण यायला तयार आहे. कितीजन तुरुंगात यायला तयार आहे. मी यावेळी हा प्रश्न नाही विचारणार. मी तुम्हाला वेगळ्या तर्‍हेने मतदान करायला संगणार आहे. आपण लोकशाही मार्गाने जाणारे आहोत. रावेरीला जेव्हा महीला अधिवेशन झालं तेव्हा कपाशीचा प्रश्न अत्यंत बिकट झाला होता आणि कापूस खरेदी होत नव्हती तेव्हा आपण रावेरी अधिवेशन संपल्या संपल्या, सगळ्या अधिवेशनाची लाखोंची संख्या घेऊन रेल्वे लाईनवर आणि रस्त्यावरती बसलो होतो. तो इतीहास पुन्हा एकदा घडवण्याचं मी ठरवलं आहे. आणि अनिलच्या विनंतीप्रमाने या सगळ्या सभेला मी विनंती करतो की, ही सभा संपल्यानंतर या सगळ्या सभेतील बायकांनी,पुरुषांनी,मुलांनी जवळ जो रस्ता तुम्हाला दाखवला जाईल, शेगाव रेल्वे स्टेशनच्या जवळ जे फ़ाटक आहे तेथे जाऊन आपण सगळ्यांनी रेल्वे अडवायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा महिला जातील आणि त्यांना शिस्तीत पहिल्यांदा पुढे जाऊ दिल्यानंतर मग पुरुषांनी तेथे जायचे आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला हा कार्यक्रम संपल्याचा आदेश होत नाही, तोपर्यंत तेथे अत्यंत शांतपणे, कोणत्याही तर्‍हेचा दंगाधोपा, नासधूस न करता, आपल्या नेहमीच्या शिस्तीने तुम्ही जर का हा कार्यक्रम राबवून दाखवला तर मी असे म्हणेन की मी तुमच्या समोर ज्या कल्पना मांडल्या, की वीज नाही, पेट्रोल नाही, श्रमशक्ती नाही या परिस्थितीमध्ये आपण पीक नियोजनाच्या हत्याराने लढणार आहोत. आणि आवश्यक पडलं तर त्याच्याकरिता आमची जुनी शमिच्या झाडावर ठेवलेली हत्यारे उपसायला सुद्धा आम्ही कमी करणार नाही. हे जर तुम्ही दाखवून दिलं तर मी असं समजेन, की तुमची खरोखर इच्छा आहे की, ७५ वर्षे मी तुमची सेवा केली, आणखी २५ वर्षे करावी. याचा पुरावा आज संध्याकाळच्या आत मला दाखवायचा आहे, एवढे बोलतो आणि आपली रजा घेतो 

                                                                                            शब्दांकन – गंगाधर मुटे
(शेगावच्या महामेळाव्यात दि. १०-११-२०१० रोजी मा. शरद जोशींनी केलेले भाषण)
…………………………….

शरद जोशी

शेगाव महामेळाव्याला उपस्थित जनसमुदाय.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल एकरी उत्पादन कैकपटींनी वाढले आहे,तरी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न ४६ % टक्क्यावरून चक्क १६ % एवढे खाली उतरलेले दिसते. याचे कारण स्पष्ट  आहे.
                      राष्ट्रीय उत्पन्न उत्पादनाच्या संख्यांकावर किंवा वजनावर नव्हे तर त्या उत्पादनाच्या मुल्यावर काढले जाते.
                     जर वजनाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न ठरवले गेले तर याक्षणी सुद्धा देशाच्या उत्पादनाच्या एकुन उत्पादनापैकी शेतीचे उत्पादन हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त असणार हे उघड आहे.
परंतू येथे मुख्य गोम अशी की
                    औद्योगीक मालाच्या किंमती स्वातंत्र्योत्तर काळात भरमसाठ वाढत गेल्यात मात्र त्यातुलनेने शेतमालाच्या किंमती वाढल्या नाहीत त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा हिस्सा कमी दिसतो.
त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादकतेशी निगडीत नसून त्या उत्पादनाच्या बाजारभावावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे

खरेच बियाणे वांझ होते … ?

खरेच बियाणे वांझ होते … ?
“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”
               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
              भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
गंगाधर मुटे
………………………………………………………………..

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

शेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे

                   आत्महत्याग्रस्त भागातील शेतकर्‍यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी मानसोपचार शिबिरे आयोजित करावी, असा वारंवार सल्ला दिला जातो त्या अनुषंगाने खालील बाबींचा विचारवंताकडून खुलासा होणे आवश्यक आहे.

१) जेंव्हा जेंव्हा शेतकरी आत्महत्येचा विषय निघतो तेंव्हा तेंव्हा शेतकरी मनोदुर्बलता किंवा मनोरुग्णतेमुळे आत्महत्या करतो असेच निदान केले जाते. आणि त्याच अनुषंगाने उपाययोजना सुचविल्या जातात. सहाजीकच, निदान जर चुकीचे असेल तर सुचविलेले उपाय योग्य कसे असणार? (वाचा – शेतकरी आत्महत्यावर तज्ज्ञांची मुक्ताफळे – )

२) आर्ट ऑफ लिविंग किंवा मानसोपचार शिबिरे आयोजित करायला हरकत नाही पण शेतकर्‍यांचे मनोबळ वाढावे यासाठी काय सांगणार? प्रबोधनाचे स्वरूप काय असणार?
उदा. शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या करत असेल तर त्याचे मनोबळ वाढविण्यासाठी

अ) कर्ज परत करण्यासाठी चोरी करा, दरोडे घाला आणि पैसे मिळवून कर्ज परत करा असे सांगणार? (शेतीच्या उत्पन्नातून/बचतीतून त्याला कर्ज फ़ेड करता आली नाही हे गृहीत धरावेच लागेल.)

आ) मरण पत्करण्यापेक्षा कर्ज बुडवायला शिकण्याचा सल्ला देणार?

इ) आर्थीक हलाखीमुळे मुलीचे लग्न करता येत नसेल तर टेंशन घेऊ नकोस, ती बिनालग्नाची राहीली तरी चालेल पण तू जगलाच पाहीजे असे सांगणार?

ई) सावकाराने कर्जापायी भरचौकात अपमान केला तरी तू मनाला लावून घेऊ नकोस, संवेदनाक्षम, हळवेपणाने जगण्यापेक्षा कोडगेपणाने वाग असा सल्ला देणार?

            मानसोपचार शिबिरे घेणार म्हणजे त्याला काय समजावणार याचा उलगडा व्हायला हवा.
रोगाचे निदानच चुकीचे घेवून एखादा मानसोपचारतज्ज्ञ उपचार करणार असेल तर अपेक्षित परीणाम कसा साधला जाईल?
हे प्रश्न अनुत्तरीत राहातात.
………………………………………………………
या अनुषंगाने झालेली एक प्रश्न-उत्तरांची देवानघेवान.


शेतकर्‍यांच्या आत्महत्यांवर पुष्कळ चर्वितचर्वण  झाले आहे.
(आणि त्या सर्वांच्या मते शेतकरी मुर्ख, मनोरुग्न व अज्ञानी आहे.)


 कित्येकदा तर मूळ विषयाचे गांभीर्य दडपून टाकून, केवळ सरकारवर तोफा डागण्यासाठी हा विषय ‘हायजॅक’ केला गेला आहे.
(हे ‘हायजॅक’ करणारे मात्र नक्कीच मनोरुग्न असणार. पाठवा त्यांना मेंटल हॉस्पीटल मध्ये. माझे सक्रिय समर्थन.)


मुंबईतल्या किंवा कुठल्याही झोपडपट्टीमधले, उकिरड्यातले अन्न वेचून खाणारे, रेल्वे रुळांवर शौचास जावे लागत असलेले, दिवसोंदिवस आंघोळ करू न शकणारे लोक आत्महत्या का करीत नाहीत? 
(ते सात पिढ्यांत फेडता येणार नाही एवढे कर्जबाजारी नाहीत म्हणून.)


त्यांच्यामध्ये जगण्याची कोणती प्रेरणा असते?
(सर्व सजीवांमध्ये जगण्याची  प्रेरणा सारखीच असते.)


 किंवा, उलटपक्षी, कॅट सारख्या परीक्षांतील अथवा कुठल्याही परीक्षेतील अपयशाला घाबरणारे, आय. आय. टी सारख्या नामवंत शिक्षणसंस्थांतून शिकणारे लोक आत्महत्या का करतात? त्यांच्यामध्ये कोणती प्रेरणा कमी पडते? महत्त्वाच्या परीक्षांच्या निकालांच्या आगेमागे आत्महत्यांची लाट का येते?  रोज रात्री नवर्‍याच्या लाथाबुक्क्यांचा मार खाऊन, प्रसंगी डाग, चटके सोसून पुन्हा सकाळी निमूटपणे सर्व अपमान व सर्वांसमोर झालेली शोभा विसरून(सूडाची भावना न ठेवता) त्याच्यासाठी स्वयंपाक बनवणारी स्त्री कोणत्या अंतःप्रेरणेने जगत असते? त्यातल्या काही आत्महत्या करतातही, पण एकंदर अत्याचाराच्या प्रमाणात त्या नगण्य असतात.
(आत्महत्येस एवढेच कारण पुरेसे नाही.)


शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशातल्या एकूण आत्महत्यांमधला एक छोटा भाग आहे.
(किती शेतकर्‍यांनी पुन्हा आत्महत्या कराव्यात म्हणजे आंकडा शोभून दिसेल ????????.
सबंध देशात फक्त एका शेतकर्‍याने जरी आत्महत्या केली तरी एखाद्याला ते लाजीरवाने वाटेल. याउलट आत्महत्या करता करता एखादी पिढी जरी उध्वस्त झाली तरी एखाद्याला त्याचे काहीच वाटणार नाही. हे समिकरण शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या संख्येवर नव्हे तर त्या “एखाद्याची” मानसिक रचना/ठेवन कशी आहे यावर अवलंबून आहे. )


 त्यातूनही, सर्वच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतात का?  
(“सर्वच कर्जबाजारी शेतकर्‍यांनी आता सामुहीक आत्महत्या करून  तसे सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास आत्महत्या करणार्‍याला आम्ही मनोरूग्न म्हणत राहू, इतर कुठल्याही कसोट्यांवर पडताळा करण्याची गरज नाही” असा याचा अर्थ घ्यायचा काय? )


जर ह्याचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर आत्महत्यांमागे मनोदुर्बलता हे कारण असण्याची शक्यता वाढते.


(मग सरकार झोपी गेले काय? अशा मनोरूग्न शेतकर्‍यांची तातडीने राज्यवार यादी बनवा आणि प्रसिद्दीला द्या. म्हणजे अशा मनोरूग्न शेतकर्‍यापासून इतर शेतकरी बांधव सुरक्षीत अंतर ठेवून चालतील.)


गंगाधर मुटे
………………………………………………………………..

गाय,वाघ आणि स्त्री

गाय,वाघ आणि स्त्री

बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारिरीक अंगाने अबलाच.स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गीक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.
उदा :- उंदराला बिळात घुसता येते,मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते,कुत्र्याला भिंतीवर नाही चढता येत.
या झाल्या उंदिर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करुन कौशल्याने अन्नमिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघु.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रुपेक्षा अधिक वेगवान पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरित्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करुन साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करुन संपुर्ण सजिव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही.विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढु शकत नाही.साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करु शकेल.
पण गायीचे काय? गाय पुर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा.(कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या ? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या ? )
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणारच. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मुलभुत मानवी स्वभावच.
गाईचे प्रेम,भुतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय,राजकिय पक्षांची कार्यालये वगैरे ठीकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दुध काढतांना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मुलभुत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल?.. गाईचे काय होईल ?.
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दुध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु.प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दुध खरेदी करणार्‍या ग्राहकांचीसंख्या किती?.
जर अशी स्थिती उद्भवली तर माणुस गाईचा त्याग करणारच.
मग गाईचे काय होईल ? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करु शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत,ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे.ना हत्तीसारखे शक्तीयुक्त सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षिण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल ?
तिला गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण ?
गायीचे जेवढे शत्रु आहेत त्या सर्वांना पराभुत करुन गायीला जिवदान,अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह,वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करु शकत नाही……………….
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच…
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भुक शमविण्याची वस्तु या नजरेने पाहाणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच…
तिचे प्राण वाचवू शकेल,अभय देवु शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कूठे ?

”गायीस अभय देण्या,वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या,सूर्यास हात नाही.”
.
..गंगाधर मुटे
…………………………………………………………..
तात्पर्यः ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जावु
शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर………….
म्हणुन गाय आणि स्त्री या दोघीत या अनुषंगाने
विचार केला तर त्यांच्या व्यथा सारख्याच वाटतात मला.
………………………………………………………….

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

………………………………………………………………………..
आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवेनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत वाढतच जाते.वैताग येतो.आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणुन विषय सोडुन देतो.
………….
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
‘आधी कोंबडी की आधी अंडी’ या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दुर होते आणि लक्षात येते की महाकठीन वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
…………………….
आज हा विषय चघळण्याचे कारण ?
२६ जानेवारी – गणराज्य-प्रजासत्ताक दिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
‘काय मिळवले काय गमविले’
‘देश जगात महाशक्ती म्हणुन उदयास येणार की नाही’.
‘देशाला प्रगतीपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिल्रे’.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा ? नेते मंडळी की जनता जनार्दन ?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा…… उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारिख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरु.
हे असे रहाटगाडगे………..पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती…..!!
याला म्हणायचे प्रजासत्ताक…..!!
जोरसे बोलो….
प्रजासत्ताक दिन चिरायु होवो….!!!!!!!!!!!!!!!
..
गंगाधर मुटे

१२.०१.२०१० 

शेतकरी पात्रता निकष.

  शेतकरी पात्रता निकष.
एक प्रश्न :- शिरीष(मायबोलीवर) यांनी “एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल – आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारिरीक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा – प्लीज! “असा प्रश्न विचारला आहे. त्याबद्दल थोडेसे…..
……………………………………………………………..
              या प्रश्नाचे उत्तर फारच अवघड आहे.असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नाही.”इधरसे बाहर निकलनेका रस्ता है,अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही”.
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले,कामातुनच गेले,मातीमोल झाले.
               हे जर मला माहीत असेल तर मी काय माहीती द्यावी? आम्ही कवी माणसं.कविता करतांना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डान घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पुर्ण करतो.पण जित्याजागत्या जिवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे. तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?

अ) हौसेखातर शेती. (उपजिविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचन नाही.घरात दोन पिढ्या जगतील ऐवढी संपत्ती असेल,पुढारीगिरी करुन माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असुन पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगुण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पाढर्‍यात रुपांतरीत करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजिविकेसाठी शेती.
उदरभरनासाठी शेती ( उदरभरन हाच शब्द योग्य.लाईफ बनविने,करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतु आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थीक खर्चाची यादी करू.अंदाजे किंमतीसह.

१) १० एकर शेतजमीन………२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ………………..२०,०००=००
२) विहीर पंप :…………………१,५०,०००=००
३) शेती औजारे :………………. ३०,०००=००
४) बैल जोडी :………………….. ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :…………… १,००,०००=००
६) साठवणूक शेड :…………..१,००,०००=००
———————————————–
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
———————————————–

सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणुक करावी लागेल.

शारिरीक गरजा :

१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिण्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळाभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावुन पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहुन नेण्याची क्षमता असावी.

मानसिक गरजा :-

१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच ” रघुपती राघव राजाराम” हे गित घरासामोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता……राम नाम सत्य है…
२) हाजीहाजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हाजीहाजी केल्यावाचुन गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगिभुत गुण असावा कारण प्रत्येक ठीकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणुन दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्‍यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्‍याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जिवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार – बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर – पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळुन गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईनते करुन घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहीजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावुन घ्यायचे.म्हणुन मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कुलर,फ्रीज,टिव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शिन-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.

कायदेशिर गरजा:-

कायदेशिर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकिल मंडळीकडून घेता येतो.

माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवुन घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्किच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहानी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम…..!
पोशिंद्याचा विजय असो….!!

. गंगाधर मुटे
==================================
वांगे अमर रहे या लेखावर आज पंकज यांची एक प्रतिक्रिया आली ती खालीलप्रमाणे…
……………………………………………………….
बटाटा अमर रहे ! …….
मुटे साहेब आज प्रामाणिक पणे वाटते की शेतीला आयकर नसावा…
काल ७०१० रु. ला आठ क्विंटल बटाटा मोडून आलोय.
संपूर्ण उत्पादन खर्च १०,६०० रु आला होता.
१०,६०० – ७०१० = ३५९० येवढा तोटा झाला.

पण कमी तोटा झाल्याबद्दल वडील थोडेसे समाधानी होते. इतर लोकांचा तोटा ऐकुन फार वाइट वाटले…
अर्थात एक एकर बटाटा निदान १५ क्विंटल निघेल आणि दर सरासरी १२ रु किलो मिळेल अशी अपेक्षा होती (म्हणजे साधारण १८००० रु). बटाटा पुण्याला आणणार होतो. त्यामुळे वडिल गावाकडून टेंपो पाठवून देणार होते आणि मी येथे व्यवहार करणार होतो. पण प्रत्येक्षात उत्पादन कमी मिळाल्यामुळे माल तिकडेच विकुन टाकला…
……………………………………………………….

शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?

       शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
       त्या ताळेबंदावरुन या व्यवस्थेने दडवुन ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासामोर येईल.देशातिल १०० टक्के शेतकर्‍याची शेती पुर्णत; तोट्याची आहे,याला अधिकृत दुजोरा मिळेल.शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकिय दाव्याचा फुगा फुटुन जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकिय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
       घरात पोटभर खायला नसुनही, मिशिवर ताव देवुन पाटीलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरुप समाजासामोर येईल.
      आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी,दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये आणण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगुस चाललाय्,त्यालाही पायबंद बसेल.
      पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमता कशी,कुठुन आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडुन ते इतरांनाच जास्त अडचनीचे आहे.
     आयकर लावल्यास गरिब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुनी बेंबीच्या देठापासुन ओरडत असेल तर त्यांना “माझं काय होईल’,असे म्हनायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहीजे.
     शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावु नये,नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल,
    आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही,कारण…
    ज्याला आय नाही त्याला कर नाही,ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
                शेतकर्‍यांना पिढोनपिढ्या लाचारासारखे जिवन जगन्यापेक्षा आर्थिक सुदृढ होवुन आयकरदाता शेतकरी म्हणुन सन्मानाने जगायला नक्किच आवडेल.
गंगाधर मुटे.
………………………………………………………………….
२६-१२-२००९
बागायती कापसाचा उत्पादन खर्च,
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
—————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
—————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००
————————————————–
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
————————————————-
================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च,
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,३७,००० = ००
————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क …….१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत…..०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा……………………………. ०,४७,००० = ००
————————————————-
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
——————————————-
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च

प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : ५०००=००
२) विहीर पंप : १५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ३००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
————————————————
एकूण भांडवली खर्च : ४,१५,०००=००
————————————————
अ) चालू खर्च..
शेण खत : ६००० रु
नांगरट करणे : २००० रु
बियाणे : ४००० रु.
रासायनीक खते : ३००० रु
निन्दन खर्च : ४००० रु.
किटकनाशके : ४००० रु.
संप्रेरके : १००० रु.
सुक्ष्मखते : १००० रु.
फवारणी मजुरी : १००० रु.
कापूस वेचणी : ६००० रु.
वाहतूक खर्च : २००० रु.
ओलीत मजुरी : ३००० रु.
वीज बिल : २००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
————————————————-
एकूण खर्च (अ) : ०,४१ ,००० = ००
————————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४००००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४००००=००
————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ४५००० = ००
—————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क १,२६,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,८१,००० = ००
————————————————–
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
– गंगाधर मुटे
====================================

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?

शिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..?.
                 ‘वांगे अमर रहे !’ हा लेख वाचुन शर्मिला यांनी जो प्रश्न उपस्थीत केला तो प्रश्न नसुन उत्तरच आहे असे मला वाटते.
                 कारण जोपर्यंत मालाची वाहतूक, स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री यात वाढ, सुधारणा होत नाही तो पर्यंत हा प्रॉब्लेम कमी होणारच नाही. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. ती टेक्नॉलॉजीही प्रगत आहे. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हून ताजे असतात. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषीप्रधान्,अर्थव्यवस्थेचा कना वगैरे असुनही विकसित का करु शकला नाही?.
                       विदेशी तंत्रज्ञान जसेच्या तसे स्विकारण्यापेक्षा देशातील लोकांना रुचेल आणि देशात ज्या शेतमालाची अधिक पैदावार होते त्यावर आधारित तंत्रज्ञान विकसित व्हायला पाहीजे. उदा.
१) बोरावर आधारित बोरकुट
२) लिंबावर आधारित सरबते
३) टोमॅटो सास
                          या व्यतिरिक्त अजुन बरेच काही करता येण्यासारखे आहे पण या सर्व पदार्थांना देशी सुगंध हवा, तरच ते लोकांच्या पसंतीस उतरेल.सामान्य लोकांनी प्रक्रिया उद्योग उभारले तरच त्याची किंमतही आटोक्यात राहु शकते,वेगवेगळ्या भागात स्थानिक शेतमालाची उपलब्धता आणि त्या भागातील लोकांची रुची लक्षात घेवुन पाऊल टाकावे लागेल.

                          हे सर्व उद्योग मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी करुन उपयोगाचे नाही कारण त्यामुळे शेतकर्‍यांना अथवा बेरोजगारांना फायदा होणार नाही.
मागे बायोडिझेल निर्मिती बद्दल बरीच चर्चा झाली.जेट्रोपा लागवड उपयोगी ठरली असती.
                             शेती विषयक तंत्रज्ञानामध्ये लहान-लहान देश पुढे-पुढे जात असतांना आमचा भल्ला मोठा देश मागे-मागे का पडतो?. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री अन्य देशांत स्थापित अवस्थेमध्ये वावरत असतांना आम्ही या विषयात अजुन पहिले पाऊल सुद्धा नीट टाकायला सुरुवात केलेली नाही. आणि आम्हाला तशी गरजही वाटत नाही. कदाचित असे तर नाही की उगीच माथापच्ची करुन नवनिर्माण करत बसण्यापेक्षा इतरांनी विकसित केलेले तंत्रज्ञान चोरुन-लपुन मिळवायचे,त्यात जुजबी फेरबदल करायचे आणि मेड इन इंडिया असा शिक्का मारला की आम्हीही जगाच्या समांतरच आहो हे भासविण्याचा सरळसोट ‘शॉर्टकट’ आम्ही निवडलाय?. हा माझा दावा नाही उगीच शंका आहे,परमेश्वर करो आणि माझी शंका खोटी ठरो.
तरी एक प्रश्न कायमचा कायमच राहतो,आम्ही त्यादिशेने पावले का टाकीत नाही?. जसे शर्मिला यांना वाटते तसे आमच्या राज्यकर्त्यांना का वाटत नाही?.
                               भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे असे मी म्हणतो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो,तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणुन म्हणतो.पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार,त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणुन लिहिले असणार… ही यादी किती लांब आहे देवच जाणे.
                              देशाचे चित्र डोळ्यासामोर ठेवुन स्वयंप्रेररणेने ‘भारत हे कृषीप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारीक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटत असते..
“कृषीक्षेत्राला भारतिय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतो परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा दिवाळीचा सन म्हणजे केंद्रिय अर्थसंकल्पच ना? तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्व खावुन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळतांना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.
                         मग ज्या देशात शेतीक्षेत्र एवढे दुर्लक्षित असेल त्या देशात स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड इन्डस्ट्री सारख्या इंडस्ट्रीज कशा उभ्या राहतील?. या ठीकानी एखाददुसरे किंवा तुरळक उदाहरण नव्हे तर व्यापकतेने देशातील ८० % जनतेचा विचार करावा लागेल. कारण पाचपन्नास युनिट उभारल्याने देशाचा प्रश्न सुटनार नाही.
                                      त्याशिवाय अशी प्रक्रिया युनिटस उभारायला स्किल्,कौशल्य, व्यावसायज्ञान, अनुभव्, आर्थिक पाठबळ  आणि मनुष्यबळ लागेल. आमच्याकडे मनुष्यबळ सोडल तर बाकी गोष्टींचा प्रचंड दुष्काळ आहे. मनुष्यबळ आहे पण त्यात बुद्धीबळ कमी आणि बाहुबळ जास्त आहे. जे काही बुद्धिबळ आहे त्यात व्यवहारज्ञान/व्यावसायिक ज्ञान कमी आणि पुस्तकी किंवा कारकुनी ज्ञान जास्त आहे. म्हणुन कारखाने काढायला कोणी सामोर येत नाही पण कारखाना निघनार म्हटल्यावर रांगा लागतात. याला आजचे युवक अजिबात जबाबदार नाहीत,असलोच तर आम्ही प्रौढ मंडळी जबाबदार आहोत. आमची शिक्षणपद्धती जबाबदार आहे.आजची शिक्षण प्रणाली म्हणजे कारकुन घडवणारे आणि बेरोजगार निर्माण करण्याचे कारखाने ठरले आहेत.शाळा कॉलेज किंवा उच्च शिक्षणाचे मुख्य सुत्र ‘लाथ मारीन तिथे पाणी काढीन’ असा विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देईल एवढे ताकदवार असायला हवे.याबाबतीत वैद्यकिय शिक्षणाचा ‘मॉडेल’ म्हणुन उपयोग होवु शकतो.मला वाटते की कदाचीत ‘डॉक्टर’ हा एकमेव विद्यार्थी असावा ज्याच्यामध्ये डिग्री हाती पडताक्षणीच आपले आयुष्य स्वबळावर जगण्याचा आत्मविश्वास आलेला असतो. बाकी क्षेत्रासाठी आपण एवढी आत्मविश्वास देणारी शिक्षणप्रणाली जर अमलात आणली तर आज गंभिर वाटणारे प्रश्न अत्यंत सुलभ होवु शकतात.दुर्दैवाने तसे होतांना दिसत नाही.
                  या देशावर वसाहतवादी राज्यसत्ता चालविण्यासाठी इंग्रजांना कारकुनांची गरज होती त्यानुरुप कारकुन तयार करणारी शिक्षणप्रणाली त्यांनी स्थापित केली.आम्ही इंग्रजांना घालवले पण त्यांची शिक्षणपद्धती आजतागायत कवटाळून बसलोच आहोत.
                 शाळा कॉलेज शिकतांना विद्यार्थी,त्याचे पालक,शिक्षण व्यवस्था या सर्वांचे मिळून अंतिम ध्येय काय असते,त्याने शिकुन सवरुन या देशाच्या प्रशासन व्यवस्थेचा एक हिस्सा होणे.अगदी कलेक्टर पासुन चपराशापर्यंत कोणतीही नोकरी मिळाली तरी चालेल पण सरकारी कारकुन व्हायचं.३ % नोकरीच्या जागा असतांना १०० % विद्यार्थ्यांना आम्ही एकाच मार्गाने ढकलतो.किमान ५० % विद्यार्थ्यांना व्यावसायीक शिक्षण द्यायला काय हरकत आहे?.
                     यासंदर्भात ‘राजा हरिश्चंद्राचे’ उदाहरण फारच बोलके आहे. राज्य गेल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी काहीतरी कामधंदा करावा म्हणुन राजा हरिश्चंद्र मजुरांच्या बाजारात जावुन उभा राहिला.त्तुला काम काय करता येते ? या प्रश्नावर हरिश्चंद्राचे उत्तर होते. “मला राज्य चालविता येते”. पण ज्यांना मजुर हवे होते त्यांच्याकडे ‘राज्य’ कुठे होते,याला चालवायला द्यायला?. राजा हरिश्चंद्रास कामच मिळेना. शेवटी स्मशानात राहुन प्रेताची रखवाली करावी लागली.
                        राज्य चालविण्याखेरिज इतर कसलेच कौशल्य नसलेला राजा हरिश्चंद्र आणि प्रशासन चालविण्या खेरिज कसलेच कौशल्य अवगत नसलेला पदवीधर यांच्यात फरक काय उरतो?
डीग्री घेवुन १०० विद्यार्थी बाहेर आले की त्यात ३ लोकांना नोकरी मिळते,ते मार्गी लागतात.उरलेले ९७ नोकरीच्या शोधात भटकत फिरतात. कारण १५-२० वर्षे शाळा कॉलेजात घालवुनही व्यवसाय,स्वयंरोजगार वा अन्य उद्योग करण्यासाठी लागणारे कौशल्य,व्यावसायिक ज्ञान आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास यापैकी त्याच्याकडे काहीही आलेले नसते. उद्योग व्यवसाय करायचे म्हटले तर बँका कर्ज देत नाही कारण बँकेला माहीत असते हा शंभराचे साठ करणार. म्हणुन बँका टाळाटाळ करतात.पदवी मिळवल्याने व्यवसायज्ञान मिळाले हे बँकेलाही मान्य नसते.
                        शेवटी एक दिवस घरात खायचे वांदे पडायला लागलेत किंवा लग्नाचे वय घसरायला लागले की मग मिळाला तो रोजगार करण्याशिवाय गत्यंतर नसते आणि आमच्या तरुणाईचे खच्चीकरण होते.त्यासोबतच असे प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर काढण्याचे प्रयत्नही निष्फळ ठरते.
                        हे सगळे बदलायचे असेल तर आहे त्या व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील आणि या बदलासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागेल.. वरना कुछ नही होनेवाला…… असंभव….!
.
……गंगाधर मुटे