शेतकर्‍यांची समांतर विधानसभा

shetkari

प्रसिद्धीपत्रक

शेतकरी संघटनेच्या वतिने

‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’

१०, ११ डिसेंबरला नागपुरात

                       मागील तीन दशकांहून अधिक काळ शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देत असलेल्या शेतकरी संघटनेने ऊस, धान, कापूस, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण, कांद्याचा प्रश्न आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. आंदोलने, रस्ता रोको, धरणे, निदर्शने यासारख्या लोकशाही मार्गाच्या आंदोलनाने शासनावर काहीच परिणाम झाला नाही म्हणून आता संघटनेने १० आणि ११ डिसेंबरला ‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभा’ नागपुरात रामनगर मैदान, रामनगर येथे आयोजित केली आहे. ही माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी आज पत्रपरिषदेत दिली. 

                 चटप यांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत मागील वर्षी कापसाला चांगला भाव असतानासुद्धा शासनाने प्रथम ५५ लाख व नंतर १० लाख गाठी एवढ्या मर्यादित प्रमाणातच निर्यातीला परवानगी दिली. त्यावेळी शेतकर्‍यांना ६ ते ७ हजार रुपये भाव मिळाला होता व नंतर एकदम ३ हजारावर आला. सुरुवातीलाच निर्यात खुली राहिली असती तर शेतकर्‍यांना ७ हजार रुपये भाव मिळाला असता.
यावर्षी जागतिक बाजारपेठेत मंदी आहे व शासनाने अजूनपर्यंत निर्यात खुली केलेली नाही. महाराष्ट्र शासनानेसुद्धा कापसाला ३३०० रुपये एवढाच भाव जाहीर केला आहे. दुसरीकडे बाजारपेठेत चांगले भाव असतील तेव्हा निर्यातबंदी व कमी असेल तेव्हा शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून देण्याचे केंद्राचे धोरण. अशा दुहेरी मारामुळे शेतकरी अडचणीत येत आहेत.

                     ‘शेतकर्‍यांची समांतर विधानसभे’च्या दोन दिवसांच्या कामकाजात बिगर बासमती तांदूळ व डाळीवरील निर्यातबंदी उठविणे, कापसाला प्रती क्विंटल ६ हजार रुपये, धानाला २६०० रुपये, सोयाबीनला ३ हजार, तर तुरीला ५ हजार रुपये एवढी किंमत द्यावी, संपूर्ण शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, वीज बिलातून मुक्ती, पूर्ण दाबाची व पूर्ण वेळ वीज देण्यात यावी या विषयांसह शेतकर्‍यांच्या अन्य जिव्हाळ्याच्या प्रश्‍नांवरही चर्चा करण्यात येणार आहे. 


                     शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधीसुद्धा विधानसभा किंवा लोकसभेत पाहिजे त्या पोटतिडकीने आवाज उठवित नाही. त्यामुळेच आपले प्रश्‍न आपणच सोडविले पाहिजे, या विचारानेच या अभिनव आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
दोन दिवसांत विविध विषयांवरील चर्चेसोबतच ठरावांसह पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. कापूस, धान, तूर, सोयाबीन व अन्य पीक उत्पादक शेतकर्‍यांनी ‘शेतकर्‍यांच्या समांतर विधानसभे’ला उपस्थित राहावे, असे आवाहनही वामनराव चटप यांनी केले.

                        पत्रपरिषदेला सरोजताई काशीकर, राम नेवले, अरुण केदार, गंगाधर मुटे, मधुसूदन हरणे, घनश्याम पुरोहित, उमेश निनावे उपस्थित होते.

अधिक माहीतीसाठी येथे भेट द्या.
————————————————————————————————————————————————–

बळीराजा डॉट कॉम

जाहीर निमंत्रण 

एक नवे संकेतस्थळ

बळीराजा डॉट कॉम

आपण येथे वाचू शकता, 
मराठीत लिहू शकता,
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता,
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा…..!
*  *  *

या मित्रांनो,

काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो,
उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो,
हक्कासाठी लढणार्‍यांनो,
लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो,
स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो,
नव्या युगाच्या निर्मात्यांनो,
या जरासे खरडू काही,
काळ्याआईविषयी बोलू काही.

* * * * * *

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको

शेगावच्या पुण्यभूमीत शेतकर्‍यांचे रेलरोको

                  दि. १० नोव्हेंबर २०१० रोजी शेतकरी सघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकरी संघटनेचा संतनगरी शेगावात स्व. गजाननदादा पाटील मार्केट यार्डमध्ये शेतकरी महामेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवी देवांग हे होते. मंचावर माजी आमदार वामनराव चटप, सरोजताई काशीकर, शैलाताई देशपांडे, दिनेश शर्मा, महिला आघाडीच्या जयश्री पाटील, हरीयाणाचे गुणीप्रकाश, कर्नाटकचे हेमंतकुमार, दिलीप भोयर, अनंत उमरीकर, सम्राट डोंगरदिवे, संजय कोले, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष नामदेवराव जाधव, रमेशसिंह राजपूत आदी उपस्थित होते. 
                मेळाव्यात प्रख्यात कवी इंद्रजीत भालेराव यांच्या ‘माझा बाप शेतकरी’ या कवितांची सीडी प्रकाशित करण्यात आली तसेच शरद जोशी यांच्या ‘भारतासाठी’ व ‘पोशिद्याची लोकशाही’ या दोन पुस्तकाचे तर कवी गंगाधर मुटे यांच्या ‘रानमेवा’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन शरद जोशींच्या हस्ते करण्यात आले. रावेरी येथे सिता मंदिराचे बांधकाम करणाऱ्या रमेश पाटील यांचा यावेळी शरद जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद जोशी यांना यावेळी कृतज्ञता निधी वामनराव चटप, कैलास पवार, रवि देवांग यांच्या हस्ते देण्यात आला.


शरद जोशी यांना कवितेचे सन्मानपत्र 


             शरद जोशी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांना इंद्रजीत भालेराव यांच्या कवितेच्या ओळी चांदीच्या तबकावर कोरून ते मानपत्र प्रदान करण्यात आले. शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होई पर्यंत कुठलाही सत्कार स्वीकारणार नाही अशी घोषणा केली होती मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जाणून मी हे सन्मानपत्र स्वीकारले असे जोशी यांनी स्पष्ट केले. मी शंभर वर्ष जगावे असे वाटत असेल तर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होण्याची लढाई जोमाने लढा माझ्यासाठी हीच उर्जा ठरेल असे भावनिक उदगार त्यांनी काढले. हे सन्मानपत्र जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक जगन्नाथ अप्पा बुरघाटे, बापुमामा थिटे, द्वारकाबाई पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
शरद जोशींनी आपल्या भाषणात धान आणि कापसाची निर्यात खुली करा, उसाला पहिली उचल २२०० रू द्या, शेतातील तोडलेली वीज तातडीने जोडून द्या इत्यादी मागण्यांच्या समर्थनार्थ रेल्वेरोको आंदोलन करण्याचे आदेश देताच उपस्थित शेतकरी रेल्वे स्थानकाकडे धावले आणि सुमारे तीन तास रेल्वे अडवून धरली. शेतकरी रेल्वे रूळावर ठीय्या मांडून बसले.
*

अमरावती-भुसावळ पॅसेंजर अडवितांना ठीय्या देऊन बसलेले शेतकरी.

…………….

राज्यपालांना सादर करावयाच्या मागण्यांचा मसुदा तयार करताना रविभाऊ देवांग व अ‍ॅड वामनराव चटप.


……………

…………..
शेगाव रेल्वेरोको आंदोलन
………..
राज्यपालांमार्फ़त त्यांचे अप्पर सचिव दे.च.खाडे व स्विय सहाय्यक यांनी आंदोलनकर्त्या नेत्यांशी चर्चा केली. शेतकरी संघटनेच्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात शेतकरी संघटनेच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले जाईल असे लेखी पत्र राज्यपालांमार्फ़त देण्यात आल्याने तीन तास चाललेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
……………………

शेतकरी युवा मेळावा

shetkari sanghatana

Baliraja

शेतकरी युवा मेळावा

हिंगणघाट : दि. १५
“रात्रंदिवस काबाडकष्ट करूनही शेतकरी कायमच कर्जबाजारी का राहातो, त्याला सन्मानाचे जीवन का जगता येत नाही, याचा शेतकरी नवयुवकांनी शोध घेऊन उत्तर शोधावे” असे आवाहन शेतकरी संघटनेचे बळीराज्य विदर्भप्रदेश अध्यक्ष जगदिश बोंडे यांनी केले. स्थानिक शिवसुमन सभागृहात संपन्न झालेल्या शेतकरी युवक मेळाव्यात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, १९७२ साली एक क्विंटल कापसाच्या किंमतीत १० ग्रॅम सोने व्हायचे, त्यानंतर शेतीमालाच्या तुलनेत अन्य वस्तुचे भाव प्रचंड वाढले. त्यामुळे कापूस शेतीच्या अर्थव्यवस्थेत आलेल्या तफ़ावतीमुळे कापूस शेतीचा व्यवसाय तोट्याचा झाला आहे. जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे यंदा कापसाला चांगले भाव मिळण्याची शक्यता असूनही जर केंद्र शासनाने निर्यातबंदी लादली तर कापसाचे भाव कोसळणार आहेत. त्याचा प्रतिकार करण्यासाठी आता शेतकरी युवकांनी कंबर कसली पाहीजे.
मेळव्याला युवा आघाडीचे विदर्भाध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, माजी आमदार सरोज काशीकर, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, प्रा.मधुकर झोटींग, प्रा.पांडुरंग भालशंकर, जि.प. सदस्य रेखा हरणे यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे संचालन सचिन डाफ़े यांनी तर आभारप्रदर्शन दत्ता राऊत यांनी केले.
मेळाव्याच्या यशस्वितेसाठी साहेबराव येडे, उल्हास कोटंबकर, जीवन गुरनुले, संतोष लाखे, शरद सावंकार, पुंडलिक हूडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
* * *

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!”

“खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!”

दि. २ ऑक्टोबरला संपन्न झालेल्या रावेरी येथिल महिला मेळाव्यात शेतकरी संघटनेने दिलेल्या आदेशानुसार वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने वर्धा जिल्हा कचेरीच्या बाजूला म. गांधी पुतळ्यासमोर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “खबरदार,जर कापूस निर्यातबंदी कराल तर…….!” असा खणखणीत इशारा देण्यात आला. सभेत बोलतांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले की,या वर्षी अतीवृष्टीमुळे पाकिस्तान व चीन या देशातील कापूस पीक बहूतांशी नष्ट झाले आहे.तसेच अमेरिकेत सुद्धा तिथला कापूस उत्पादक शेतकरी मका व इतर पिकांकडे वळला आहे. भारतात सुद्धा महाराष्ट्र व गुजरातमध्ये अतिपावसामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कापसाला चांगले भाव मिळण्याची संधी निर्माण झाली आहे.
परंतू देशांतर्गत कापसाचे भाव पाडण्यासाठी शासनावर मिलमालकांकडून दबाव येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार निर्यातीवर बंदी आणण्याचे छडयंत्र रचण्याचा प्रयत्न करीत आहे. तो सहन केला जाणार नाही असा इशारा देण्यात आला.
या इशारा आंदोलनाला माजी जिल्हाध्यक्ष निळकंठराव घवघवे,नंदकिशोर काळे,पांडुरंग भालशंकर,जीवन गुरनुले,उल्हास कोटंबकर यांनी संबोधित केले.
या इशारा आंदोलनाला युवक आघाडीप्रमुख सचिन डाफ़े,दत्ता राऊत,डॉ. महाकाळकर,बाबाराव दिवानजी,प्रभाकर झाडे,रामभाऊ तुळणकर,अरविंद बोरकर,रविंद्र खोडे,किसना वरघने,रमेश बोबडे,देविदास मुजबैले,विजय राठी,डॉ. अनिल पोफ़ळे,मंसाराम कोल्हे,दमडू मडावी,सुनिल लुंगसे,धोंडबा गावंडे तसेच सर्व आघाड्यांचे प्रमुख आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.

दत्ता राऊत
प्रसिद्धीप्रमुख.

महिमा कशाचा ?

महिमा कशाचा ? 

कृपया एक गणित सोडवा.
जर शामराव M.Sc, Ph.D , I.A.S असेल तर….

१) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शेतीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
२) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता व्यवसायात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
३) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता रिक्षा चालविण्यात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
४) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता शासकिय नोकरीत वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.
५) जर त्याने त्याची विद्वत्ता/लायकी/पात्रता राजकारणात वापरली तर त्याचे मासिक उत्पन्न किती.

महिमा कशाचा ? पात्रतेचा की व्यवस्थेचा?

मी पात्रता आणि लायकीबद्दल एवढेच म्हणेन की ज्यांना व्यवस्थेपेक्षा पात्रताच महत्वाची आहे असे वाटते त्यांनी शेती करून आपली पात्रता/लायकी सिद्ध करून दाखवावे. स्वत:चा अनुभव सांगावा,इतरांचा नाही.
वस्तुत: लायकीच्या बळावर या देशात अर्थप्राप्ती होते हे विधानच खोटे आहे.
येथे लायकी नव्हे तर व्यवस्थेला महत्व आहे भाऊसाहेब.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

राष्ट्रीय उत्पन्न आणि शेती.

                         १९७० साली भारताच्या समग्र उत्पन्नाच्या ४६% टक्के उत्पन्न शेतीतून येत होते आणि ७०% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून होती. मात्र आज चित्र वेगळे आहे. आता भारताच्या समग्र उत्पन्नाच्या फक्त १६% टक्के उत्पन्न शेतीतून येते पण अजूनही ५५% जनता शेतीवर रोजगारासाठी अवलंबून आहे.
१९७० नंतर शेतीची उत्पादकता कमी झालेली नाही या उलट शेतीमधिल एकरी उत्पादन कैकपटींनी वाढले आहे,तरी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न ४६ % टक्क्यावरून चक्क १६ % एवढे खाली उतरलेले दिसते. याचे कारण स्पष्ट  आहे.
                      राष्ट्रीय उत्पन्न उत्पादनाच्या संख्यांकावर किंवा वजनावर नव्हे तर त्या उत्पादनाच्या मुल्यावर काढले जाते.
                     जर वजनाच्या आधारे राष्ट्रीय उत्पन्न ठरवले गेले तर याक्षणी सुद्धा देशाच्या उत्पादनाच्या एकुन उत्पादनापैकी शेतीचे उत्पादन हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त असणार हे उघड आहे.
परंतू येथे मुख्य गोम अशी की
                    औद्योगीक मालाच्या किंमती स्वातंत्र्योत्तर काळात भरमसाठ वाढत गेल्यात मात्र त्यातुलनेने शेतमालाच्या किंमती वाढल्या नाहीत त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा हिस्सा कमी दिसतो.
त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादकतेशी निगडीत नसून त्या उत्पादनाच्या बाजारभावावर अवलंबून आहे हे आपण लक्षात घेतले पाहीजे

बागायती कापसाचा उत्पादन खर्च

बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप :१५००००=००
३) शेती औजारे : ३००००=००
४) बैल जोडी : ६००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : ४६००००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत : २५००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १५००० रु.
किटकनाशके : १६००० रु.
संप्रेरके : ३००० रु.
सुक्ष्मखते : १२००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : २४००० रु.
वाहतूक खर्च : ६००० रु.
ओलीत मजुरी : १२००० रु.
वीज बिल : ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : ४६०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : ४६०००=००
——————————————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २५०००० = ००
——————————————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत १८०००० = ००
———————————————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क २,५०,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा ०,७०,००० = ००
———————————————————————————
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,आणि १ विहिर १० एकराचे ओलित होवु शकते असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च

जिरायती कापसाचा उत्पादन खर्च.
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती : २००००=००
२) विहीर पंप : ००००=००
३) शेती औजारे : २००००=००
४) बैल जोडी : ४००००=००
५) बैलांचा गोठा : १०००००=००
६) साठवणूक शेड : १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च : २,८०,०००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :००००० रु
नांगरट करणे : ८००० रु
बियाणे : १६००० रु.
रासायनीक खते : १२००० रु
निन्दन खर्च : १०००० रु.
किटकनाशके : १०००० रु.
संप्रेरके : ०००० रु.
सुक्ष्मखते : ०००० रु.
फवारणी मजुरी : ३००० रु.
कापूस वेचणी : १२००० रु.
वाहतूक खर्च : ३००० रु.
ओलीत मजुरी : ०००० रु.
वीज बिल : ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड : २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : ७६,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
…. चालु गुंतवणुकिवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
——————————————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क         १,३७,००० = ००
——————————————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत ९०,००० = ००
———————————————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क …….१,३७,००० = ००
ग) एकुण उत्पन्नाची बाजार किंमत…..०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा……………………………. ०,४७,००० = ००
———————————————————————————
.
.
…….. वरिलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, तृटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारना करता येईल.
उत्पादनखर्च काढतांना मी गृहित धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करु शकतो,असे गृहित धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहित धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरुन त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला अहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इंन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षनामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनीक खते,किटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषि विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
                                            गंगाधर मुटे
—————————————————–
=========================================

खरेच बियाणे वांझ होते … ?

खरेच बियाणे वांझ होते … ?
“भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?”
               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची…पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला तरच इच्छाशक्ती,आशावाद,मनोबळ उपयोगाचे. नाही तर शुन्य उपयोगिता.
              भुईला पण वाटते की त्या बीजाचा जन्म व्हावा. मातृत्वाची प्रेरणा काय असते,हे त्या मातेलाच कळे. पण ती तरी काय करणार बिचारी? ओलाव्यासाठी ती पुर्णत: मेघावर अवलंबून. मेघाकडून तिला पाण्याचे थेंबच हवे. कोरडे गर्जन नकोच. कोरड्या गर्जनाचा आवाज फ़ार मोठा. अशा गर्जनांमुळे गर्जना केल्याचा मेघाला आनंद मिळेलही कदाचित. पण अशा गर्जनांचा भुईने आणि बीजाने उपयोग तरी काय करून घ्यावा?
             बीजाला उगवता आले नाही कारण मातीत ओलावा नव्हता. आणि मातीत ओलावा तयार होण्यात न होण्यात बीजाचा दोष तो काय?
            पाऊस पाडला नाही हा दोष मेघांचा. दोष मात्र मढला जातो बीजाच्या माथ्यावर.
मेघांना दोषी ठरविण्यासाठी लागणारी हिंमत ज्यांच्याकडे नाही ते चक्क बियाणेच वांझ होते असा शेरा मारून मोकळे होतात.
गंगाधर मुटे
………………………………………………………………..